वर्ल्डकप 2023 स्पर्धेचा थरार आता अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे सेमीफायनलची फेरी गाठण्यासाठी प्रत्येक संघांमध्ये चुरस रंगली आहे. बुधवारी दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड संघात अतिशय रंगदार सामना झाला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पुण्याच्या गहुंजे मैदानावर झालेल्या या सामन्यात आफ्रिकेने न्यूझीलंडचा १९० धावांनी पराभव केला. स्पर्धेतील पहिले ४ सामने जिंकल्यानंतर न्यूझीलंडचा हा सलग तिसरा पराभव ठरला. या सामन्यात न्यूझीलंडचा संघ गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये अपयशी ठरल्याचं दिसून आलं.
दरम्यान, न्यूझीलंडच्या या पराभवाचा पाकिस्तानला मोठा फायदा झाला आहे. पाकिस्तानच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. येत्या ४ नोव्हेंबरला बंगळुरू येथे पाकिस्तानचा सामना न्यूझीलंडसोबत होणार आहे.
या सामन्यात जो संघ बाजी मारेल, तो संघ सेमीफायनलच्या दिशेने महत्वाचं पाऊल टाकणार आहे. न्यूझीलंडचे सध्या ७ सामन्यांत ८ गुण आहेत. तर पाकिस्तानच्या नावावर ७ सामन्यांत फक्त ६ गुण जमा आहेत.
जर पाकिस्तानने बेंगळुरूमधील सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवला, तर त्याच्या खात्यात ८ गुण जमा होतील. न्यूझीलंडचेही ८ सामन्यांत केवळ ८ गुण होतील. जर पाकिस्तानने तो सामना ८३ धावांनी जिंकला किंवा धावसंखेचा पाठलाग ३५ षटकांपूर्वी केला तर ते न्यूझीलंडला नेट रनरेटच्या बाबतीत सुद्धा मागे टाकू शकतील.
सध्या न्यूझीलंडचा +०.४८४ आणि पाकिस्तानचा - ०.०२४ आहे. त्यामुळे या सामन्यात पाकिस्तान मोठ्या विजयाच्या इराद्याने मैदानात उतरू शकतो. दरम्यान, बेंगळुरूमधील सामन्यानंतर दोन्ही संघांना प्रत्येकी एक सामना खेळायचा आहे. न्यूझीलंडचा सामना श्रीलंकेसोबत तर पाकिस्तानचा कोलकातामध्ये इंग्लंडसोबत होणार आहे.
श्रीलंका आणि इंग्लंड या दोन्ही संघांना आतापर्यंत चांगली कामगिरी करता आलेली नाही. दोन्ही संघ गुणतालिकेत तळाशी आहेत. दुसरीकडे भारत आणि दक्षिण आफ्रिकेने जवळपास सेमीफायनलची फेरी गाठली आहे.
दोन्ही संघ गुणतालिकेत पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर असून दोघांचे प्रत्येकी १२ गुण आहेत. याशिवाय ऑस्ट्रेलियाचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाच्या नावावर ६ सामन्यात ८ गुण जमा आहेत. त्यामुळे चौथ्या स्थानासाठी आता न्यूझीलंड आणि पाकिस्तानमध्ये रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.