Duleep Trophy 2024 Latest Update: भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील टी-२० मालिकेत भारतीय संघातील खेळाडूंनी शानदार खेळ केला. मात्र वनडे मालिकेत भारतीय संघाला निराशा हाती आली आहे. वनडे मालिकेत भारतीय संघाला २-० ने पराभवाचा सामना करावा लागला.
दरम्यान भारतीय संघ थेट १९ सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्ध सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेत खेळताना दिसणार आहे. यादरम्यान भारतीय खेळाडूंना ४० दिवसांचा ब्रेक मिळणार आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंना ५ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या दुलीप ट्रॉफी स्पर्धा खेळण्यासाठी सांगण्यात आलं आहे.
भारतीय संघातील स्टार फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा बऱ्याच वर्षांनी देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी परतणार अशी चर्चा सुरु होती. मात्र एसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार, विराट कोहली, रोहित शर्मा आणि आर अश्विन हे खेळाडू दुलीप ट्रॉफी खेळण्याची शक्यता खूप कमी आहे. दरम्यान या स्पर्धेसाठी उर्वरीत खेळाडूंची निवड केली जाऊ शकते, असं म्हटलं जात आहे.
या स्पर्धेसाठी केएल राहुल आणि रिषभ पंतचेही कमबॅक होऊ शकते. रिषभ पंत गेल्या काही वर्षांपासून कसोटी क्रिकेटपासून दुर आहे. मात्र त्याची या स्पर्धेसाठी निवड केली जाऊ शकते. तर सरफराज खान,सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल हे देखील या स्पर्धेत खेळताना दिसून येऊ शकतात.
आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेदरम्यान भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे त्याला गेले काही महिने भारतीय संघातून बाहेर राहावं लागलं आहे.
मात्र अशी शक्यता वर्तविली जात आहे की, मोहम्मद शमी बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत खेळताना दिसून येऊ शकते. त्याआधी त्याला स्वत:ची फिटनेस सिद्ध करुन दाखवावी लागणार आहे. त्यामुळे तो दुलीप ट्रॉफी स्पर्धेत खेळताना दिसून येऊ शकतो.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.