

Vaibhav Suryavanshi News : टी २० वर्ल्डकप २०२६ साठी भारतीय संघाची घोषणा झाली. सूर्यकुमारच्या नेतृत्वाखालील संघात शुभमन गिल याला स्थान देण्यात आलेलं नाही. दुसरीकडं डोमेस्टिक क्रिकेटमध्ये दे दणा दण धावा करणाऱ्या आणि प्रतिस्पर्धी संघाच्या चिंधड्या उडवणाऱ्या वैभव सूर्यवंशीला टी २० वर्ल्डकप संघात घेण्यात यावं, अशी मागणी माजी दिग्गज क्रिकेटपटू के. श्रीकांत यांनी केली आहे. वैभव सूर्यवंशी याला लवकरात लवकर सिनिअर संघात घेण्यात यावं. सचिन तेंडुलकर सुद्धा कमी वयात वरिष्ठ संघात होता, असंही श्रीकांत यांनी म्हटलंय.
टी २० वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाची आधीच घोषणा झाली आहे. आता विलंब झाला असला तरी, निवड समितीतील सदस्यांची इच्छा असेल तर, सूर्यवंशीला आताही टी २० वर्ल्डकप संघात घेऊ शकतात, असा सल्लाही श्रीकांत यांनी दिला आहे. एज ग्रुप क्रिकेटमध्ये वैभव सूर्यवंशी जबरदस्त कामगिरी करत आहे. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये तर तो खोऱ्यानं धावा ओढत आहे. या युवा क्रिकेटपटूचं फलंदाजीचं तंत्र आणि त्याची धावांची भूक ही तो इतरांपेक्षा वेगळा आहे हे ठरवते, असंही श्रीकांत यांनी म्हटलं आहे.
सचिन तेंडुलकर यानं १६ व्या वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. वैभव सूर्यवंशीने देखील आपल्यापेक्षा वयाने मोठ्या प्रतिस्पर्धींविरोधात आपली क्षमता दाखवून दिली आहे. आता निवड समिती सदस्यांनी प्रतीक्षा न करता या प्रतिभावान खेळाडूला शक्य तितक्या लवकर वरिष्ठ संघात संधी द्यावी, असे श्रीकांत यांनी सूचवले आहे.
वैभव सूर्यवंशी यानं विजय हजारे ट्रॉफीमध्ये बिहारकडून खेळताना पहिल्याच सामन्यात इतिहास रचला होता. लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात शतक करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने अवघ्या ८४ चेंडूंमध्ये १९० धावांची विस्फोटक खेळी केली. तर आपलं शतक त्यानं फक्त ३६ चेंडूंमध्ये पूर्ण केलं होतं. वैभव सूर्यवंशी यानं वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये सातत्यानं चांगली फलंदाजी केली आहे. त्याच्या या कामगिरीनं श्रीकांत प्रचंड इम्प्रेस झाले आहेत. निवड समिती सदस्यांनी वेळ न दवडता या खेळाडूला संधी दिली पाहिजे, असं त्यांचं मत आहे.
वैभव सूर्यवंशी ज्या संघातून खेळतो तिथे तो शतक ठोकत आहे. आयपीएल असो की अंडर १९ क्रिकेट. त्यात तो तुफान फटकेबाजी करत आहे. हा युवा खेळाडू कुठल्याही सामन्यात प्रतिस्पर्धी गोलंदाजांची धुलाई करत आहे. त्याला टी २० वर्ल्डकपसाठी फास्ट ट्रॅक केला पाहिजे, असं मी मागील वर्षीही म्हणालो होतो. कदाचित आता विलंब झाला आहे. पण त्याला संघात फास्ट ट्रॅक करू शकतात. या फलंदाजामध्ये प्रचंड क्षमता आहे. त्याला लवकरात लवकर भारतीय संघात संधी दिली पाहिजे, असे श्रीकांत म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.