
दक्षिण आफ्रिकेने केला ऑस्ट्रेलियाचा सलग दुसऱ्या सामन्यात पराभव
दुसऱ्या वनडेत ऑस्ट्र्लियाचा ८४ धावांनी पराभव
एनगिडीनं पाच विकेट घेत ऑस्ट्रेलियाचा डाव मोडून काढला
दक्षिण आफ्रिकेने तीन सामन्यांची वनडे मालिका जिंकली
World champions Australia defeated in ODI cricket : आपल्या घरात सगळेच वाघ असतात असं म्हणतात. पण याच वाघाला घरात घुसून धोबीपछाड देणं येरागबाळ्याचं काम नाही. चोकर्सचा धप्पा लागलेल्या दक्षिण आफ्रिका संघानं हा करिश्मा केलाय. मायदेशातील वनडे मालिकेत बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रिका संघानं धूळ चारलीय. या मालिकेतील सलग दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला लोळवलं आहे.
ऑस्ट्रेलिया संघाला मायदेशात पराभवाला सामोरे जावं लागलं. कर्णधार पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, स्टीव्ह स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्याशिवाय ऑस्ट्रेलियाचा संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मैदानात उतरला. पण वनडे मालिकेच्या दोन्ही सामन्यांत पराभूत व्हावं लागलं. मॅक्केमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं पुन्हा एकतर्फी सामना जिंकला. यजमान ऑस्ट्रेलियाला ८४ धावांनी पराभूत केलं. या विजयासह दक्षिण आफ्रिकेनं तीन सामन्यांची वनडे मालिका जिंकली.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका या दोन संघांमध्ये काही दिवसांपूर्वीच टी २० मालिका झाली. त्यात दक्षिण आफ्रिकेला २-१ ने पराभूत केलं होतं. पण वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोठं आव्हान होतं. कारण कर्णधार पॅट कमिन्स आणि स्टार्कसारख्या दिग्गज खेळाडूंना या मालिकेत विश्रांती दिली होती. तर स्टीव्ह स्मिथ आणि मॅक्सवेलसारख्या स्टार फलंदाजांनी या फॉरमॅटमधून काही महिन्यांआधीच निवृत्ती घेतली होती.
या वनडे मालिकेच्या पहिल्या सामन्यात ९८ धावांनी विजय मिळवणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघानं दुसऱ्या सामन्यातही जबरदस्त खेळ केला. पण या सामन्याची सुरुवात हवी तशी झाली नव्हती. अवघ्या २३ धावांवर सलामीवीर माघारी परतले होते. त्यानंतर मॅथ्यू ब्रेट्ज्के आणि स्टब्ज यांनी डाव सावरला. दोघांनी मोठी भागीदारी केली. दोघांनी अर्धशतके केली, पण मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. टोनी डिजोर्जीनं ३८ धावा केल्या. तसंच अखेरच्या फलंदाजांनीही योगदान दिलं. त्या जोरावर दक्षिण आफ्रिका संघानं २७७ धावांपर्यंत मजल मारली. ऑस्ट्रेलियाच्या अॅडम झॅम्पा यानं सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.
ऑस्ट्रेलियाचा संघ हे आव्हान घेऊन मैदानात उतरला. त्यांचा डाव सुरुवातीपासूनच ढेपाळला. १० षटकांचा खेळ पूर्ण झाला नाही तोवर कर्णधार मिचेल मार्शसह तीन विकेट गमावल्या. कॅमरन ग्रीन आणि जॉश इंग्लिस (८७ धावा) यांनी मोठी भागीदारी रचली. पण संघाच्या १०० धावा झाल्यानंतर एकापाठोपाठ एक असे दोन हादरे बसले. ग्रीन ३५ धावा करून बाद झाला. तर काही वेळातच कॅरी सुद्धा माघारी परतला.
इंग्लिस हा एका बाजूने झुंजत होता. पण त्याला दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही. दक्षिण आफ्रिकेच्या एनगिडीने ऑस्ट्रेलियाचा डाव मोडून काढला. एनगिडीनं पाच विकेट घेतल्या आणि संघाला ८४ धावांनी विजय मिळवून दिला. दक्षिण आफ्रिकेने सलग पाचव्यांदा ऑस्ट्रेलियाला वनडे मालिकेत नमवलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.