

कॉमनवेल्थ गेम्सच्या दुसऱ्या दिवसाअखेर भारताच्या खात्यात एक पदक जमा झालंय. पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये झंडू कुमार यांनी ब्राँझ पदक जिंकत भारताला स्पर्धेतील पहिलं पदक मिळवून दिलंय. याशिवाय पॅरा स्विमिंग, बॉक्सिंग आणि लॉन बाउल्समध्येही भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी करत पुढील फेऱ्यांमध्ये त्यांची वाटचाल सुरू ठेवलीये.
पुरुषांच्या हेवीवेट पॅरा पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत २८ वर्षीय झंडू कुमार यांनी ब्राँझ पदकाची कमाई केलीये. पोलिओमुळे आलेलं शारीरिक आव्हान, आर्थिक अडचणी आणि आयुष्यातील कठीण परिस्थितीवर मात करत त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःचं स्थान निर्माण केलं. या स्पर्धेत त्यांनी १८१ किलो आणि १९० किलो वजन यशस्वीरीत्या उचलत १३०.९ पॉईंट्स मिळवले.
मात्र १९६ किलो वजन उचलण्याचा त्यांचा तिसरा आणि शेवटचा प्रयत्न अपुरा ठरला. याच स्पर्धेत भारताचे सुधीर यांनी ११४.१ पॉईंट्ससह सहावं स्थान मिळवलं. या गटात नायजेरियाच्या इदरीस रिलुवान यांनी १३२.८ गुणांसह सुवर्णपदक पटकावलं. तर मॅथ्यू हार्डिंग यांनी १३१ गुणांसह रौप्यपदक जिंकलं.
बिहारमध्ये जन्मलेल्या झंडू कुमार यांचा प्रवास अत्यंत खडतर राहिला. त्यांच्या वडिलांचा भाजी विकण्याचा व्यवसाय होता. लहानपणापासून त्यांनी कुटुंबाला हातभार लावत भाजी विकली. त्यानंतर त्यांनी ई-रिक्षाही चालवली.
२०२३ मध्ये राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पैसे नसल्याने त्यांनी स्वतःची गाडी विकली होती. त्याआधी त्यांनी पॅरा अॅथलेटिक्समध्ये शॉटपुट आणि डिस्कस थ्रो या प्रकारात जिल्हा आणि राज्यस्तरावर अनेक पदकं जिंकली होती. ताकद आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी सामान्य खेळाडूंसोबत होणाऱ्या पॉवरलिफ्टिंग स्पर्धांमध्येही सहभाग घेतला.
कोचच्या मार्गदर्शनानंतर झंडू यांनी २०२२ मध्ये पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये प्रवेश केला. कोलकात्यातील पहिल्याच स्पर्धेत त्यांनी रौप्यपदक जिंकत आपल्या क्षमतेची झलक दाखवली.
२०२५ मध्ये पुरुषांच्या ७२ किलो गटात त्यांनी राष्ट्रीय विक्रम नोंदवला. राष्ट्रीय स्पर्धेत २०५ किलो वजन उचलून जुना विक्रम मोडला. त्यानंतर काही दिवसांतच नवी दिल्लीत झालेल्या 'खेलो इंडिया पॅरा गेम्स'मध्ये २०६ किलो वजन उचलत विक्रम केला. यानंतर वर्ल्ड पॅरा पॉवरलिफ्टिंग वर्ल्ड कप आणि आशिया-ओशिनिया ओपन चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी ब्राँझ पदक जिंकलं. तसंच वर्ल्ड पॅरा पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये अव्वल सहा खेळाडूंमध्ये स्थान मिळवलं.
पुरुषांच्या लाइटवेट पॅरा पॉवरलिफ्टिंग प्रकारात भारताला आणखी एक पदक मिळण्याची संधी होती. मात्र अशोक मलिक यांना १४३.८ गुणांसह चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं आणि ते पदकापासून थोडक्यात दूर राहिले. या स्पर्धेत इंग्लंडच्या मार्क स्वान यांनी १५३.९ पॉईंट्ससह सुवर्णपदक जिंकलं. नायजेरियाच्या रोलँड एझुरुइके यांनी तितक्याच १५३.९ पॉईंट्ससह रौप्यपदक मिळवलं. तर मलेशियाच्या बोनी बनयाउ गुस्टिन यांनी १५३.५ गुणांसह ब्राँझ पदक पटकावलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.