

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) तर्फे नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनची 2025-26 सिझनमधील रणजी ट्रॉफी सामन्यासाठी निवड झाली आहे. त्यामुळे नाशिककरांना पुन्हा एकदा रणजी ट्रॉफीचा थरार अनुभवायला मिळणार आहे. हा सामना 1 ते 4 नोव्हेंबर 2025 दरम्यान हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान गोल्फ क्लबमध्ये खेळवला जाणार आहे.
या सामन्यात महाराष्ट्र आणि सौराष्ट्र संघ आमनेसामने येणार आहेत. महाराष्ट्र टीमकडून पृथ्वी शॉ, ऋतुराज गायकवाड आणि अंकित बावणे हे दिग्गज खेळाडू मैदानात उतरणार आहे. तर सौराष्ट्र संघाकडून रवींद्र जडेजा, जयदेव उनाडकट आणि चेतन साकरिया यांसारखे आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकलेले खेळाडू सहभागी होणार आहेत. त्यामुळे नाशिककरांसाठी हा सामना खास ठरणार आहे.
अनंत कान्हेरे मैदानावर आतापर्यंत 11 रणजी सामने खेळवण्यात आले आहेत. त्यापैकी सर्वाधिक विजय महाराष्ट्र टीमने मिळवले आहेत. याशिवाय गुजरात, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, मुंबई, विदर्भ, झारखंड, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बडोदा या टीम्सनेही सामने खेळले आहेत.
या सामन्यासाठी महाराष्ट्र आणि सौराष्ट्र संघ बुधवारी नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. सामन्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी महानगरपालिका आयुक्त आणि नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षा मनीषा खत्री यांनी मैदानाला भेट दिली. दरम्यान या सामन्यासाठी बीसीसीआयने एस. डॅनियल मनोहर (हैद्राबाद) यांची सामनाधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. पंच म्हणून तन्मय श्रीवास्तव (दिल्ली) आणि साईधर्शन कुमार (अहमदाबाद) काम पाहतील.
आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंच्या उपस्थितीमुळे नाशिककरांना उच्च दर्जाचा क्रिकेट सामना पाहण्याची संधी मिळणार आहे. रणजी ट्रॉफीच्या या सामन्यासाठी सर्व तयारी एकदम जोशात सुरू असल्याचं एनडीसीएचे अध्यक्ष विनोद शहा यांनी सांगितलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.