
आयपीएल २०२५ मधील ३६ वा सामना आज राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळला जाणार आहे. दिल्ली विरुद्धच्या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन रिटायर्ड हर्ट होऊन माघारी परतला होता. या सामन्यादरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमधून संजू सॅमसन आणि राजस्थानचा प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यात काहीतरी बिनसले आहे अशी चर्चा रंगली होती.
दिल्ली विरुद्ध राजस्थान सामन्यात सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळाला. सुपर ओव्हरपूर्वी राहुल द्रविड हे राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंना मार्गदर्शन करत होते. संघातील खेळाडू आणि द्रविड यांच्यात चर्चा सुरु होती. त्या वेळेस कर्णधार संजू सॅमसन चर्चेत सहभागी झाला नव्हता. चर्चेत सहभागी होण्यास संजूने हाताने नकार दिला. ही घटना स्टेडियमवरील कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार संजू सॅमसन यांच्यात वाद सुरु असल्याचे म्हटले जात होते. द्रविड आणि संजू यांच्यात बरंच काही बिनसलंय अशा चर्चा सुरु होत्या. दरम्यान या एकूण प्रकरणावर राहुल द्रविड यांनी भाष्य केले आहे. एका पत्रकार परिषदेमध्ये राहुल द्रविड बोलत होते.
राहुल द्रविड म्हणाले, मला माहीत नाही की हे रिपोर्टस् कुठून येत आहेत. संजू आणि माझे एकच मत एकच आहे. संजू राजस्थान संघाचा अविभाज्य घटक आहे. तो प्रत्येक निर्णयात आणि चर्चेत सहभागी असतो. काही वेळेस, जेव्हा सामन्यात पराभवाचा सामना करावा लागतो आणि गोष्टी तुमच्या हिशोबाने घडत नाही, तेव्हा तुम्हाला टिकेचा सामना करावा लागतो. कामगिरीच्या माध्यमातून आम्ही टीकाकारांना प्रत्युत्तर देऊ शकतो, पण अशा निराधार चर्चांवर आम्ही काहीही करु शकत नाही. संघामध्ये चांगले वातावरण आहे. सर्व खेळाडू कठोर परिश्रम करत आहेत. यामुळे मी खुश आहे. ज्या वेळेस एखादा खेळाडू चांगली कामगिरी करत नाही, तेव्हा त्यालाही वाईट वाटत असते ही गोष्ट लोकांना का समजत नाही?
दिल्ली विरुद्ध राजस्थानच्या सामन्यात फलंदाजी करताना संजू सॅमसन दुखापतग्रस्त झाला होता. १९ चेंडूंवर ३१ धावा केल्यानंतर त्याने रिटायर्ड हर्ट होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर संजूला मैदानाबाहेर नेण्यात आले होते. त्यामुळे आजच्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स सामन्यात संजू सहभागी होईल की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जर संजू फिट नसला तर रियान परागकडे नेतृत्त्व दिले जाईल असा अंदाज वर्तवला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.