
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी झालेल्या तगड्या संघांपैकी एक असलेल्या न्यूझीलंड संघाला जोरदार झटका बसला आहे. तेजतर्रार गोलंदाज बेन सियर्स हा संपूर्ण स्पर्धेबाहेर झाला आहे. संघ व्यवस्थापनानं आता त्याच्या जागी अन्य एका वेगवान गोलंदाजाला संघात स्थान दिलं आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ या स्पर्धेला सुरुवात होण्यास आता काही दिवसच उरले आहेत. काही संघांनी आपल्या चमूमधील खेळाडूंची नावं घोषित केली आहेत. पण त्यात काही ना काही बदल होत आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलियानंतर आता न्यूझीलंड संघालाही आपल्या संघात बदल करावा लागला आहे.
वेगवान गोलंदाज बेन सियर्सच्या रुपानं न्यूझीलंडच्या संघाला तगडा झटका बसल्याचे मानले जात आहे. हॅम्सट्रिंगमुळं त्याला स्पर्धेबाहेर व्हावे लागले. न्यूझीलंडनं आता बेनच्या जागी अन्य एका वेगवान गोलंदाजाला संघात घेतलं आहे. न्यूझीलंडचा संघ सध्या पाकिस्तानातच आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीआधी सुरू असलेल्या तिरंगी मालिकेत ते खेळत आहेत.
न्यूझीलंडकडून प्रसिद्ध केलेल्या अधिकृत माहितीनुसार, बेन सियर्सला कराचीमध्ये सरावादरम्यान हॅम्सट्रिंगचा त्रास झाला. त्यानंतर स्कॅन करण्यात आला. रिपोर्टनुसार, बेनला किमान २ आठवड्यांसाठी मैदानापासून दूर ठेवावं लागेल, असे सांगण्यात आले. त्यामुळे बेनच्या जागेवर चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवडलेल्या चमूत ओटागो व्होल्ट्सचा वेगवान गोलंदाज जेकब डफी याचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या सुरू असलेल्या तिरंगी मालिकेत तो खेळत आहे.
बेन सियर्स स्पर्धेबाहेर झाल्यानंतर न्यूझीलंड संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी निराशा व्यक्त केली आहे. स्पर्धा सुरू होण्यास काही दिवस शिल्लक असताना दुखापतीमुळं तो बाहेर होणं खूपच निराशाजनक आहे. बेनच्या कारकीर्दीतील ही पहिली आयसीसी स्पर्धा असती. पण दुर्दैवानं त्याला स्पर्धेबाहेर जावं लागलं, असं स्टीड यांनी सांगितलं.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी न्यूझीलंड संघाच्या चमूमध्ये आणखी काही बदल बघायला मिळू शकतात. त्यामुळे आता रचिन रवींद्र आणि लॉकी फर्ग्युसनच्या फिटनेसवर सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. तिरंगी मालिकेतील पहिल्या सामन्यात झेल पकडताना चेंडू डोक्यावर लागून रचिन रवींद्रला दुखापत झाली होती. तर फर्ग्युसन अद्याप दुखापतीतून सावरलेला नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.