
विक्रमवीर रोहित शर्मा, विक्रमादित्य विराट कोहली आणि मैदानावरचा जादूगार रवींद्र जडेजा या तीन दिग्गज खेळाडूंची ही अखेरची आयसीसी स्पर्धा असेल, अशी चर्चा सुरू झाली आहे. आता याबाबत भारताच्या माजी क्रिकेटपटूनंही संकेत देऊन फोडणी दिली आहे. भारतीय क्रिकेटमधील हे तीन दिग्गज खेळाडू आयसीसीची ही अखेरची स्पर्धा खेळणार आहेत, असं त्यानं सांगितलं.
रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या तिघांनी २०२४ च्या टी २० वर्ल्डकप विजयानंतर टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता तिघेही दिग्गज खेळाडू चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकत्रित खेळणार आहेत. १९ फेब्रुवारीपासून ही स्पर्धा सुरू होत आहे. त्याचदरम्यान हे तिघेही खेळाडू ही शेवटची आयसीसी स्पर्धा खेळणार आहेत, अशी चर्चा सुरू झाली आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा यानंही यावर प्रतिक्रिया दिली. रोहित, विराट आणि जडेजा हे तिघेही ही अखेरची आयसीसी स्पर्धा खेळणार आहेत, असे चोप्रा म्हणाला.
रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या तिघांबद्दल आकाश चोप्रा यानं त्याच्या युट्यूब चॅनलवर प्रतिक्रिया देताना वेगळेच संकेत दिले आहेत. आकाश चोप्राच्या म्हणण्यानुसार, चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ही या तिघांची अखेरची आयसीसी स्पर्धा असू शकते. तिघेही या स्पर्धेसाठी संघात आहेत. रोहित शर्मा हा संघाचं नेतृत्व करतोय, असे तो म्हणाला. चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू व्हायला काही दिवस शिल्लक असताना आकाश चोप्रानं केलेल्या वक्तव्यामुळं भारतीय क्रिकेट विश्वात खळबळ माजली आहे.
रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या तिघांनीही टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. जून २०२५ मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होणार आहे. पण यातून टीम इंडिया बाहेर झाली आहे. पुढच्या वर्षी म्हणजेच २०२६ मध्ये टी २० वर्ल्डकप होणार आहे. त्यातही हे तिघे खेळणार नाहीत. त्यानंतर २०२७ मध्ये वनडे वर्ल्डकप स्पर्धा होणार आहे. पण त्यावेळी टीम इंडियाचा चेहरामोहराच बदलून जाणार आहे. त्यामुळे ही अखेरची आयसीसी स्पर्धा आहे, असं चाहत्यांना तर वाटतेय, पण त्याचबरोबर या खेळाडूंनाही तसंच वाटू लागलं आहे. तशी दाट शक्यता आहे. त्यामुळं मला वाटतंय की ही आयसीसीची स्पर्धा या तिघांचीही अखेरची असणार आहे, असे आकाश चोप्रा म्हणाला.
बॉर्डर - गावसकर ट्रॉफी सुरू असतानाच या तिन्ही भारतीय खेळाडूंच्या भवितव्यावर प्रचंड चर्चा झाली होती. २०२७ च्या वर्ल्डकप स्पर्धेत हे तिघे खेळणार का, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात होता. तिघांच्या वयाच्या कारणामुळं ही चर्चा सुरू झाली होती. तिघांचे वय ३६ वर्षांपेक्षा जास्त आहे. रोहित शर्मा तर एप्रिल २०२५ मध्ये ३८ वर्षांचा होईल. या तिघांचे फिटनेस कमालीचे आहे. त्यामुळे वयाचा इथे प्रश्नच उद्भवत नाही. आता हे तिघे आगामी वनडे वर्ल्डकप खेळणार का, हा येणारा काळच ठरवेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.