KKR Vs SRH Playing 11: कोलकाताचा रसगुल्ला की हैदराबादची बिर्याणी? कुणाची चव बिघडणार? पाहा हेड-टू-हेड रेकॉर्ड
Kolkata Knight Riders Vs Sunrisers Hyderabad: इंडियन प्रीमियर लीगच्या १६ व्या हंगामातील १९ वा सामना आज कोलकाता नाईट राईडर्स विरुद्ध सनराईज हैदाराबाद यांच्यात होणार आहे. कोलकाता येथील ईडन मैदानावर सायंकाळी ७ वाजता या सामन्याला सुरूवात होईल. त्यामुळे कोलकाताचा रसगुल्ला की हैदराबादची बिर्याणी कुणाची चव कोण बिघडवणार याकडेच क्रिडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.
गेल्या सामन्यात गुजरात टायटन्सला त्याच्या घरच्या मैदानावर पराभूत केल्यानंतर चर्चेत आलेला रिंकू सिंग आज त्याच्या घरच्या मैदानावर उतरणार आहे. रिंकूने गुजरातविरुद्धच्या सामन्यात शेवटच्या पाच चेंडूंवर सलग ५ षटकार ठोकत केकेआरला अनपेक्षित विजय मिळवून दिला होता. (Latest Marathi News)
कोलकात्याच्या चाहत्यांना आज पुन्हा रिंकूच्या विस्फोटक खेळीची आशा असेल. त्यासाठी रिंकू सिंगला फलंदाजीत बढती सुद्धा मिळणार असल्याची शक्यता आहे. रिंकूवर आपली लय कायम ठेवण्याचे दडपण असेल, दुसरीकडे हैदराबाद संघाला रिंकूच्या आक्रमक फटकेबाजीची चिंता असेल.
केकेआरला रसेल, राणाच्या फॉर्मची अपेक्षा
यंदाच्या हंगामात केकेआरने दोन विजय मिळवले आहेत. दोन्ही विजयांमध्ये त्यांचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल आणि कर्णधार नितीश राणा यांनी फारसे योगदान दिले नाही. रसेलने पंजाबविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 19 चेंडूत 35 धावा केल्या, पण पुढच्या दोन सामन्यात त्याला केवळ शून्य आणि एक धावा करता आल्या. (Breaking Marathi News)
दुसरीकडे कर्णधार नितेश राणाचीही तीच अवस्था आहे. सुरूवातीच्या तीन सामन्यांमध्ये राणाला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. केकेआरने आतापर्यंतच्या तिन्ही सामन्यांमध्ये वेगवेगळ्या सलामीच्या जोड्या आजमावल्या असून त्यात पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे.
हैदराबादचा संघ कागदावरच मजबूत?
एडन मार्करामच्या नेतृत्वाखालील सनरायझर्सकडे हॅरी ब्रूक, मयंक अग्रवाल आणि हेनरिक क्लासेनसारखे खेळाडू असले तरी संघाची आतापर्यंतची कामगिरी बघता, तो कागदावरच मजबूत असल्याचं दिसत आहे. सनरायझर्सकडे टी-२० स्पेशलिष्ट अनेक खेळाडू आहेत.
परंतु पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्यांना प्रभाव पाडण्यात अपयश आले आहे. राहुल त्रिपाठीच्या नाबाद 74 धावांच्या खेळीच्या जोरावर त्यांनी गेल्या सामन्यात पंजाबचा आठ गडी राखून पराभव केला. या विजयामुळे उत्साही होऊन ब्रायन लाराच्या प्रशिक्षित सनरायझर्स संघ केकेआरला कडवी झुंज देण्यासाठी मैदानात उतरणार आहे. त्रिपाठी मधल्या षटकांमध्ये पुन्हा महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, तर सनरायझर्स ब्रूक आणि क्लासेन यांच्याकडून चांगल्या योगदानाची अपेक्षा करेल. (Latest sports updates)
कोलकाता vs हैदराबाद हेड-टू-हेड रेकॉर्ड
आयपीएलच्या इतिहासात दोन्ही संघ आतापर्यंत २३ वेळा (IPL 2023) आमने-सामने आले आहेत. यामध्ये १५ सामन्यांत कोलकाताने बाजी मारली असून हैदराबादला केवळ ८ सामने जिंकता आले आहेत. दोन्ही संघाचा हेड-टू-हेड रेकॉर्ड पाहता कोलकाताचा संघ हैदराबादवर भारी पडताना दिसतोय. मात्र, यंदाच्या हंगामात हैदराबादने मजबूत संघ निवडला असून या संघाला हरवण्यासाठी केकेआरला विशेष प्रयत्न करावे लागतील.
Edited by - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.