
मुंबईसमोर राजस्थानच्या शिलेदारांनी गुडघे टेकल्याचं पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षण करतानाही कॅच घेण्याच्या संधी सोडणाऱ्या राजस्थानचे खेळाडू फलंदाजीतही अपयशी ठरले. जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर मुंबईने राजस्थानचा १०० धावांनी धुव्वा उडवत, सलग सहावा विजय मिळवला. या सामन्यात मुंबई इंडियन्सचे गोलंदाज आणि फलंदाजांनी शानदार कामगिरी केली. राजस्थान रॉयल्ससाठी कर्णधार रियान परागने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला.
प्रथम फलंदाजी करताना मुंबईने २१७ धावा केल्या. रोहित शर्मा आणि रायन रिकल्टन हे संघाचे सर्वात मोठे हिरो ठरले. दोन्ही फलंदाजांनी अर्धशतके झळकावली. तर मुंबईकडून गोलंदाजी करताना हार्दिक पंड्या, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह या वेगवान गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांना मोठी खेळी करण्याची एकही संधी दिली नाही. राजस्थान रॉयल्ससमोर विजयासाठी २१८ धावांचे लक्ष्य होते. ज्याचा पाठलाग करताना त्यांचा संपूर्ण संघ १६.१ षटकात ११७ धावांवर गारद झाला.
मागील सामन्यात शतक करत अनेकांना घाम फोडणारा वैभवला दीपक चाहरनं शुन्यावर बाद केलं. त्यानंतर ट्रेंट बोल्टने यशस्वी जैस्वालला १३ धावांवर बाद केले. त्यानंतर बोल्टने नितीश राणाला ९ धावांवर बाद केलं. मुंबईच्या गोलंदाजांनी राजस्थानच्या वरच्या फळीतील तीन खेळाडूंना स्वस्त माघारी पाठवलं.
त्यानंतर राजस्थानच्या फलंदाजांची पडझड चालूच राहिली. राजस्थान रॉयल्स संघाची सलामी जोडी लवकर बाद झाल्यानंतर मधली फळी डाव सावरतील असं वाटलं होतं, परंतु त्यांनीही गुडघे टेकले. जसप्रीत बुमराहने देखील पाचव्या षटकात मधल्या फळीतील रियान पराग आणि शिमरॉन हेटमायरला बाद केलं.
त्यानंतर राजस्थानची पूर्ण घसरगुंडी झाली आणि संपूर्ण संघ २० षटकेही खेळू शकला नाही. राजस्थानकडून जोफ्रा आर्चरने सर्वाधिक ३० धावा केल्या. मुंबईकडून गोलंदाजी करताना 'इम्पॅक्ट सब' कर्ण शर्मा आणि ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. तर जसप्रीत बुमराहला विकेट मिळाल्या. हार्दिक पांड्या आणि दीपक चहर यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली.
चालू हंगामात मुंबई इंडियन्सचा हा सलग सहावा विजय आहे. मुंबईचे आता ११ सामन्यांपैकी सात विजयांसह एकूण १४ गुण आहेत. चांगल्या नेट-रन रेटमुळे मुंबई पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर आलीय. दुसरीकडे राजस्थान रॉयल्सला ११ सामन्यांपैकी आठवा पराभव पत्करावा लागला. या परभवासह राजस्थान प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले. राजस्थानपूर्वी, चेन्नई सुपर किंग्ज (CSK) देखील प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे.
मुंबई इंडियन्सला १३ वर्षांनी जयपूरमध्ये आयपीएलमध्ये विजय मिळाला आहे. यापूर्वी २०१२ मध्ये जयपूरमध्ये झालेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात मुंबईने १० विकेट्सने विजय मिळवला होता. आता १३ वर्षांनंतर हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली जयपूरमध्ये मुंबईचा विजय झाला. चालू हंगामात हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबईचा हा सलग सहावा विजय आहे. जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर मुंबईने एकूण ९ आयपीएल सामने खेळले आहेत, त्यापैकी ६ सामने जिंकलेत. आणि दोन सामने गमावले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.