Mumbai Indians vs Punjab Kings IPL 2023 Match Result: सलामीवीर इशान किशानची ७५ धावांची धुव्वाधार खेळी, त्याला सूर्यकुमार यादवने दिलेली ६६ धावांची साथ आणि शेवटच्या काही षटकात तिलक वर्माने केलेल्या जोरदार फटकेबाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जचा ७ चेंडू आणि ६ गडी राखून पराभव केला. गेल्या सामन्यात पंजाबने वानखेडेवर मुंबईचा पराभव केला होता. (Latest sports updates)
या पराभवाचा बदला मुंबईने मोहालीत घुसून घेतला. मुंबईचा यंदाचा हंगामातील हा पाचवा विजय आहे. या विजयासह त्यांनी गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. मोहालीच्या मैदानावर प्रथम फलंदाजी करताना पंजाबने मुंबईसमोर विजयासाठी २१५ धावांचं आव्हान ठेवलं होतं.
या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरूवात अत्यंत खराब झाली. रिषी धवनने कर्णधार रोहित शर्माला पहिल्याच षटकात माघारी पाठवलं. रोहितला भोपळाही फोडता आला नाही. रोहित बाद झाल्यानंतर कॅमरून ग्रीनने इशान किशनच्या साथीने मुंबईचा डाव सावरला. दोघांनी मिळून दुसऱ्या विकेट्साठी ५४ धावा जोडल्या.
मात्र, नॅथन एलिसला मोठा फटका मारण्याच्या नादात ग्रीन बाद झाला. त्याने १८ चेंडूत २३ धावांची खेळी केली. ग्रीन बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव फलंदाजीसाठी आला. त्याने इशान किशनच्या साथीने पंजाबच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. दोघांनी चौफेर फटकेबाजी करत पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेतला.
तिसऱ्या विकेटसाठी सूर्यकुमार आणि ईशान किशनने ५५ चेंडूत ११६धावांचा पाऊस पाडला. पंजाबच्या प्रत्येक गोलंदाजांचा यांनी समाचार घेतला. इशान किशनने ४१चेंडूत ७५ धावांची खेळी केली. यामध्ये त्याने ४ षटकार आणि ७ चौकार लगावले. दुसरीकडे सूर्यकुमार यादवने ३१ चेंडूत ६६ धावांचा पाऊस पाडला. त्याने आपल्या खेळीत २ षटकार आणि ८ चौकार लगावले.
सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन बाद झाल्यानंतर टीम डेविड आणि तिलक वर्मा यांनी फिनिशिंग टच दिला. दोघांनी पंजाबची गोलंदाजी फोडून काढली. तिलक वर्मा आणि टिम डेविड यांनी १६ चेंडूत नाबाद ३८ धावांची विजयी भागिदारी केली. डेविडने १० चेंडूत ३ चौकारांसह १९ धावांचे योगदान दिले. तर तिलक वर्माने १० चेंडूत २६ धावांचा पाऊस पाडला. यामध्ये ३ षटकार आणि १ चौकाराचा समावेश होता.
तत्पुर्वी पंजाबने प्रथम फलंदाजी करताना मुंबईसमोर २१५ धावांचा डोंगर उभा केला. पंजाबकडून लिम लिव्हिंगस्टोनने ४२ चेंडूत नाबाद ८२ धावांची धडाकेबाज खेळी केली. तर अमरावतीच्या जितेश शर्माने त्याला चांगली साथ दिली. जितेशने २७ चेंडूत नाबाद ४९ धावा कुटल्या. लिव्हिंगस्टोनने आपल्या खेळीत ७ चौकार आणि ५ षटकार ठोकले. तर जितेश शर्माने ५ चौकारासह २ षटकार खेचले. मुंबईकडून पियूष चावलाने ४ षटकात २९ धावा देत २ गड्यांना बाद केलं. तर अर्शद खानने १ विकेट्स घेतली. दोघांव्यतिरिक्त मुंबईच्या कोणत्याही गोलंदाजाला यश मिळालं नाही.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.