

भारताने 2026 आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीमध्ये आणखी एक गोल्ड मेडल पटकावलं आहे. साहिल जाधव आणि चिकिता तानीपार्थी या जोडीने कंपाउंड मिक्स्ड टीम प्रकारात दक्षिण कोरियाचा पराभव करत गोल्ड मेडलवर नाव कोरलं. हा सामना इतका अटीतटीचा झाला की, चारही सेटनंतर दोन्ही टीम्सचा स्कोअर 157-157 असा बरोबरीत होता. त्यामुळे सामन्याचा निकाल शूट-ऑफमधून ठरवण्यात आला. यात भारताने 20-19 अशी बाजी मारत सुवर्णपदक जिंकलं.
पहिल्या दोन सेटनंतर भारताने 80-78 अशी दोन पॉईंट्सची आघाडी घेतली होती. मात्र तिसऱ्या सेटमध्ये ही आघाडी कमी होऊन भारताकडे फक्त एका पॉईंटची आघाडी राहिली. त्यामुळे एकूण स्कोअर 118-117 असा झाला. त्यानंतर शेवटच्या सेटमध्ये दक्षिण कोरियाने परफेक्ट 20 गुण मिळवले. त्यामुळे साहिल आणि चिकितावर मोठा दबाव आला.
चिकिता तिच्या शॉटमध्ये 9 पॉईंट्स मिळवू शकली. त्यामुळे भारताला सामना वाचवण्यासाठी साहिलच्या शेवटच्या शॉटमध्ये 10 गुणांची गरज होती. साहिलने 10 गुण मिळवले नसते तर भारताला सिल्व्हर मेडलवर समाधान मानावं लागलं असतं.
मात्र साहिलने शेवटच्या शॉटमध्ये कोणतीही चूक केली नाही. त्याने अचूक 10 गुण मिळवत भारताचा स्कोअर 157 पर्यंत नेला आणि सामना बरोबरीत आणला. त्यामुळे विजेता ठरवण्यासाठी शूट-ऑफ घेण्यात आला. शूट-ऑफमध्ये दोन्ही संघांना प्रत्येकी दोन शॉट मारायचे होते.
शूट-ऑफच्या सुरुवातीला भारत आणि दक्षिण कोरियाच्या खेळाडूंनी प्रत्येकी 10 गुण मिळवले. साहिलनेही 10 गुणांचा अचूक निशाणा साधला. मात्र दक्षिण कोरियाच्या महिला खेळाडूचा बाण मिडिल पॉइंटच्या तुलनेने जास्त जवळ लागला. भारताच्या खेळाडूंचे बाण मिडिल पॉइंटपासून थोडे दूर होते.
यानंतर सगळ्यांच्या नजरा दक्षिण कोरियाच्या पुरुष खेळाडू चोई याच्यावर होत्या. त्याने 10 गुण मिळवले असते, तर दक्षिण कोरियाच्या नावावर गोल्ड मेडल गेलं असतं. मात्र निर्णायक क्षणी चोईवर दबाव आला आणि त्याला 9 पॉईंट्स मिळवता आले. त्यामुळे भारताने हातातून निसटलेला सामना आपल्या बाजूने फिरवला आणि साहिल जाधव व चिकिता तानीपार्थी यांनी भारताला गोल्ड मेडल मिळवून दिलं.
शूट-ऑफमध्ये दोन्ही टीम्सचा स्कोअर समान राहिला तर मिडिल पॉइंटच्या आधारावर विजेता ठरवला जातो. ज्या संघाचा बाण मिडिल पॉइंटच्या सर्वात जवळ लागतो, त्या टीमला विजेता घोषित केलं जातं.
या गोल्ड मेडल 2026 आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंत एकूण 54 पदकं जिंकली आहेत. यामध्ये 8 गोल्ड, 21 सिल्वर आणि 25 कांस्य पदकांचा समावेश आहे. स्पर्धेच्या 12व्या दिवशी भारताच्या खात्यात आतापर्यंत दोन पदकं आली आहेत. विशेष म्हणजे ही दोन्ही पदकं तिरंदाजीमध्ये मिळाली असून, दोन्हीही सुवर्णपदकं आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.