भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना बुधवारी कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियमवर रंगणार आहे. या मालिकेत भारतीय संघाला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. मालिकेतील पहिला सामना बरोबरीत समाप्त झाला होता. तर मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. या मालिकेत भारतीय संघ ०-१ ने पिछाडीवर आहे. त्यामुळे मालिकेतील तिसरा सामना जिंकणं भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचं असणार आहे.
मालिकेतील पहिला सामना बरोबरीत सुटल्यानंतर भारतीय संघाला दुसरा सामना जिंकण्याची सुवर्णसंधी होती. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेला २४० धावांवर रोखलं होतं. भारतीय संघाला जिंकण्यासाठी २४१ धावा करायच्या होत्या. रोहित आणि गिलने ९७ धावांची भागीदारीही करुन दिली होती. मात्र रोहित बाद झाल्यानंतर भारतीय संघाचा डाव गडबडला. भारतीय संघाचा डाव २०८ धावांवर आटोपला. यासह भारतीय संघाला हा सामना ३२ धावांनी गमवावा लागला.
अॅक्यूवेदरने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, भारत आणि श्रीलंका यांच्यात होणाऱ्या तिसऱ्या सामन्यावेळी पाऊस पडण्याची शक्यता ही ४० टक्के इतकी असणार आहे. हा सामना दुपारी २:३० वाजता सुरु आहे. दरम्यान सामन्याच्या दिवशी सकाळी पाऊस पडण्याची शक्यता ही ४० टक्के इतकी असणार आहे. तर दुपारच्या वेळी ही शक्यता ४३ टक्क्यांपर्यंत वाढेल. तर संध्याकाळच्या वेळी वादळी वाऱ्यांसह पाऊस पडेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
श्रीलंकेला ही मालिका जिंकून इतिहास रचण्याची संधी असणार आहे. गेल्या २७ वर्षांत श्रीलंकेला भारतीय संघाविरुद्ध खेळताना एकही मालिका जिंकता आलेली नव्हती. १९९७ मध्ये भारतीय संघाला वनडे मालिका गमवावी लागली होती. त्यानंतर २७ वर्ष भारतीय संघाचं वर्चस्व पाहायला मिळालं. मात्र हा सामना जिंकून श्रीलंकेला इतिहास रचण्याची संधी असणार आहे. दरम्यान हा सामना पावसामुळे रद्द झाला, तर श्रीलंका ही मालिका १-० ने आपल्या नावावर करेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.