भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेनंतर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला आहे. या दोघांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर, या दोघांची जागा कोण घेणार? अशी चर्चा सुरु आहे. विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला यायचा. त्याची जागा घेण्यासाठी शुभमन गिल आणि ऋतुराज गायकवाड यांना प्रबळ दावेदार मानलं जात आहे. दरम्यान भारतीय संघाचा माजी खेळाडू रॉबिन उथप्पा याने विराटची जागा घेण्यासाठी प्रबळ दावेदार कोण? याबाबत भाष्य केलं आहे.
रॉबिन उथप्पाने सोनी स्पोर्ट्सवर एका चर्चा सत्रात सहभाग घेतला होता. त्यावेळी तो म्हणाला की,'आपण दोघांनाही संघात का नाही ठेऊ शकत? कारण दोघेही शानदार फलंदाज आहेत. दोघांची टी-२० क्रिकेटमधील आकडेवारी सर्व काही सांगुन जाते. त्यामुळे तुम्ही दोघांपैकी एकाची निवड करु शकत नाही. जर तुम्ही सातत्यपूर्ण कामगिरीबद्दल बोलाल,तर ऋतुराज आघाडीवर आहे. तर दुसरीकडे शुभमन गिल हा पॉवरफुल खेळाडू आहे.'
तसेच तो पुढे म्हणाला की, ' या दोघांपैकी एकाची निवड करणं कठीण आहे. तसं पाहायचं झालं, तर दोघांनी एकत्र संघात खेळायला हवं. मला हेच विचारायचं आहे की, दोघं एकत्र का नाही खेळू शकत? कारण दोघेही ऑल फॉरमॅट खेळाडू आहेत.'
श्रीलंकेचे माजी खेळाडू रसेल आर्नोल्ड यांच्या मते, शुभमन गिल हा विराट कोहलीची जागा घेण्यासाठी योग्य पर्याय आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, 'मी शुभमन गिलची निवड करेल, कारण त्याच्यात दमखम आहे. तो इतर भारतीय खेळाडूंपेक्षा वेगळा आहे.'
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.