
शुभमन गिल ८७, अक्षर पटेल ५२, श्रेयस अय्यर ५९ धावा. ही आकडेवारी भारत आणि इंग्लंड यांच्यात पार पडलेल्या पहिल्या वनडे सामन्यातील आहे. इंग्लंडने भारतीय संघासमोर जिंकण्यासाठी २४९ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केली आणि इंग्लंडवर ४ गडी राखून शानदार विजय मिळवला.
या विजयासह भारतीय संघाने वनडे मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. भारताने हा सामना जिंकला असला तरीदेखील एका प्रश्नाने भारतीय संघाचं टेन्शन वाढवलं आहे. तो प्रश्न म्हणजे पुढच्या सामन्यात विराट कोहलीने कमबॅक केलं, तर प्लेइंग ११ मधून बाहेर कोण होणार?
श्रीलंकविरुद्ध झालेल्या पराभवानंतर विराट कोहली आणि रोहित शर्माची जोडी बऱ्याच दिवसांनंतर वनडे सामने खेळण्यासाठी मैदानात उतरणार होती. मात्र सामन्यापूर्वीच वाईट बातमी समोर आली. विराट कोहली दुखापतीमुळे खेळू शकला नाही. विराटच्या गुडघ्याला दुखापत असल्याची माहिती कर्णधार रोहित शर्माने दिली.
विराट पहिल्या सामन्यातून बाहेर बसला. मात्र दुसऱ्या वनडेत तो खेळताना दिसून येऊ शकतो. विराट आल्यानंतर प्लेइंग ११ मधून बाहेर कोण जाणार? या प्रश्नामुळे रोहितची डोकदुखी वाढणार आहे.
या सामन्यात यशस्वी जयस्वालला पदार्पण करण्याची संधी मिळाली. मात्र त्याला या संधीचा फायदा घेता आला नाही. तो अवघ्या १५ धावा करत माघारी परतला. रोहितला तर अवघ्या २ धावा करता आल्या.
उपकर्णधार शुभमन गिलची बॅट चांगलीच तळपली. गिलने ८७ धावा केल्या. तर श्रेयस अय्यरने ५९ ,अक्षर पटेलने ५२ धावांची खेळी केली. तर केएल राहुल २ धावांवर माघारी परतला. यशस्वी, रोहित आणि राहुलला सोडलं तर सर्वांनीच फलंदाजीत योगदान दिलं.
यशस्वी आपला पहिलाच सामना खेळत होता. त्यामुळे त्याला संघाबाहेर ठेवता येणार नाही. तर रोहित कर्णधार आहे आणि केएल राहुल यष्टीरक्षक आहे. त्यामुळे या दोघांनाही बाहेर ठेवता येणार नाही.
दुसरीकडे अक्षर पटेलने गोलंदाजीत आणि फलंदाजीतही योगदान दिलं. जडेजाने सुरुवातीला गोलंदाजीत आणि संधी मिळाल्यानंतर शेवटी फलंदाजीतही दम दाखवला. त्यामुळे नेमकं कोणाला बाहेर बसवायचं, हा मोठा प्रश्न रोहित शर्मा आणि टीम मॅनेजमेंटसमोर असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.