भरत मोहळकर,साम प्रतिनिधी
टी-20 वर्ल्डकपची फायनल मॅच, साऱ्या भारतीयांनी श्वास रोखून धरला होता...दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी लक्ष्य होतं 6 चेंडूत 16 धावा. आफ्रिकेचा डेव्हिड मिलर ठाण मांडून उभा होता. हार्दीकच्या पहिल्याच चेंडूवर मिलरनं उत्तुंग फटका लगावला, अनेकांनी तर सिक्सर समजून आशाच सोडली.
त्याचवेळी बॉन्ड्री लाईनवर सूर्यकुमार यादवनं अफलातून कॅच पकडत सामन्याचं अख्खं चित्रच पालटून टाकलं. सूर्यकुमारनं घेतलेला कॅच या मॅचचा टर्निंग पॉइंट ठरला... भारतीय टीमनं दक्षिण आफ्रिकेच्या तोंडातून विजयाचा घास हिरावून घेत आयसीसी टी20 विश्वचषकावर आपलं नाव कोरलं.
भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर 177 धावांचं आव्हान दिलं होतं. त्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकन संघाने सुरुवातीच्या धक्क्यांनंतर सामन्यात पुनरागमन केले होते. क्विंटन डी-कॉक आणि हेनरिक क्लासेन या जोडीनं तुफान फटकेबाजी करत आफ्रिकेच्या संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले होते.
क्लासेनच्या फटकेबाजीमुळे दक्षिण आफ्रिकेसाठी 30 चेंडूत 30 धावा अशी सोपी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पुढच्या दोन षटकांत क्लासेन सामना संपवणार असे चित्र असतानाच हार्दिक पांड्यानं कमाल करुन दाखवली. हार्दिक पांड्यानं 17 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर हेनरिक क्लासेनला आऊट केले. त्यानं केवळ 4 रन्स दिल्या.
ज्यावेळी दक्षिण आफ्रिकेला 24 चेंडूत 26 धावांची गरज होती. त्यावेळी हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, अर्शदीप यांनी भेदक मारा केला... त्याला जोड मिळाली ती सूर्यकुमार यादवच्या फिल्डिंगची.. सूर्यानं कॅचच नव्हे तर अख्खी मॅच भारताच्या पारड्यात टाकली. मिलरला आऊट केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचं शेपूट वळवळलं ते नावापुरातच.
शेवटच्या बॉलवर भारतानं विजयावर शिक्कामोर्तब केलं आणि सारा देश जल्लोषात न्हाऊन निघाला. रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दीक पांड्या सगळ्यांनीच आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली. रोहित बार्बाडोसच्या मैदानात मैदानात नतमस्तक झाला. आपण चॅम्पियन आहोत आणि चॅम्पियनच राहू हे टीम इंडियानं पुन्हा एकदा दाखवून दिलं
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.