

राजीव कासले, साम टीव्ही
10 नोव्हेंबर 2022... हा तो दिवस होता ज्या दिवशी टीम इंडियाचा टी-20 वर्ल्ड कपमध्ये पराभव झाला होता, त्यानंतर तब्बल 4 वर्षांनी म्हणजे 22 फेब्रुवारी 2026 ला टीम इंडियाला टी-20 वर्ल्ड कपमध्ये पराभवाचा सामना करावा लागला.. टी-20 वर्ल्ड कपमधला सलग 12 सामन्यांचा विजयी रथ दक्षिण आफ्रिकेने रोखला...
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा 76 धावांनी पराभव केला... टी20 वर्ल्ड कप इतिहासातला टीम इंडियाचा हा सर्वात मोठा पराभव ठरलाय... सुपर-8च्या पहिल्याच फेरीत टीम इंडियाचा सामना होता तो बलाढ्य दक्षिण आफ्रिकेशी... दक्षिण आफ्रिकेने ठेवलेल्या 188 धावांचा पाठलाग करताना टीम इंडिया अवघ्या 111 धावांवर ऑलआऊट झाली... या पराभवाने भारतीय संघाचे कमकुवत दुवे समोर आले आहेत
टीम इंडियाचे कमकुवत दुवे
- गेल्या 10 सामन्यात ओपनिंग जोडी सातत्याने अपयशी ठरतेय
- अभिषेक शर्मा गेल्या 3 सामन्यात शुन्यावर बाद
- फिरकी गोलंदाजी खेळताना टीम इंडियाला अडचण
- अक्षर पटेल उपकर्णधार असूनही संघात स्थान नाही
- सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा अपेक्षित कामगिरी करण्यात अपयशी
अभिषेक शर्मा, ईशान किशन, संजू सॅमसन असे आक्रमक पर्याय असतानाही गेल्या 10 सामन्यात टीम इंडियाच्या सलामीच्या जोडीला एकदाही 50 धावांचा आकडा गाठता आलेला नाही. अभिषेक शर्मा गेल्या तीन सामन्यात शुन्यावर बाद होतोय, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने कशाबशा 15 धावा केल्या.
विशेष म्हणजे फिरकी गोलंदाजी खेळताना टीम इंडियाला अडचण येत असल्याचं प्रकर्षणाने जाणवतंय. अक्षर पटेल उपकर्णधार असूनही त्याला संघात का ठेवलं नाही यावर देखील प्रश्न उपस्थित केले जातायत. याशिवाय मधल्या फळीतील कर्णधार सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्माही अपेक्षित कामगिरी करण्यात अपयशी ठरतायत.
आता टीम इंडियाचे सुपर-8 फेरीतील पुढचे दोन सामने वेस्ट इंडिज आणि झिम्बाव्वेविरुद्ध आहेत... हे सामने टीम इंडियाला केवळ जिंकून चालणार नाहीत तर मोठ्या फरकारने दोन्ही संघांना हरवावं लागणार आहे... पण दोन पैकी एकाही सामन्यात पराभव पत्करावा लागला तर मात्र टी-20 वर्ल्ड कपमधून टीम इंडिया बाहेर पडण्याचा धोका आहे.
गतविजेती टी इंडिया यंदाही टी-20 वर्ल्ड कप जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानली जात असली तरी यापुढचे सामने सोपे नाहीत हे नक्की...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.