IND vs USA T20 World Cup: अमेरिकेला नमवत टीम इंडियाची सुपर ८ मध्ये धडक,  ७ विकेट राखून दणदणीत विजय
IND vs USA T20 World CupSaam Digital

IND vs USA T20 World Cup: अमेरिकेला नमवत टीम इंडियाची सुपर ८ मध्ये धडक, ७ विकेट राखून दणदणीत विजय

IND vs USA T20 World Cup Update : अमेरिकेच्या संघाने दिलेल्या १११ धावांचे आव्हान भारतीय संघाने ७ विकेट राखत पार केले.या विजयासह टीम इंडियाने सुपर ८ मध्ये धडक मारली. या विजयासह टीम इंडियाने एक विक्रमही केलाय. नासाऊ काउंटी क्रिकेट स्टेडियमवर १११ हा सर्वात मोठी धावसंख्या होती. याआधी पाकिस्तानने १०७ धावांचा पाठलाग केला होता.
Published on

टी २० विश्वचषक २०२४ च्या २५ व्या सामन्यात भारताचा सामना अमेरिकेशी झाला. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या स्टेडियमवर अमेरिकेच्या संघाने भारतासमोर १११ धावांचे आव्हान ठेवले होते. भारतीय संघाने ७ विकेट राखत हे आव्हान पार केले. या विजयासह टीम इंडियाने सुपर ८ च्या फेरीत धडक मारली. सूर्यकुमारला जीवनदान देणं अमेरिकेच्या संघाला महागात पडलं. सूर्याने ४९ चेंडूत नाबाद ५० धावा केल्या. सूर्याची फटकेबाजी आणि अर्शदीप सिंगची भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने अमेरिकाला पराभूत केलं.

टीम इंडियाने टी २० विश्वकप २०२४ च्या सुपर-८ फेरीत प्रवेश केलाय. न्यू यॉर्कमध्ये खेळल्या गेलेल्या आणखी एका रोमहर्षक लो-स्कोरिंग सामन्यात भारताने यजमान अमेरिकेचा ७ गडी राखून पराभव केला. या सामन्यात टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग. अर्शदीपने ४ विकेट घेत अमेरिकेला केवळ ११० धावांवर रोखले. त्यानंतर सुरुवातीच्या धक्क्यांनंतर सूर्यकुमार यादवच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर टीम इंडियाने हे लक्ष्य १९ षटकांत पूर्ण केले. दरम्यान उत्कृष्ट गोलंदाजीसाठी अर्शदीप सिंगला प्लेअर ऑफ द मॅच घोषित करण्यात आलं.

नासाऊ काउंटी स्टेडियमवरील विश्वचषकातील हा शेवटचा सामना होता. अखेरच्या सामन्यातही खेळपट्टीत आणि मैदानात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पुन्हा एकदा दोन्ही संघाच्या गोलंदाजांनी आपली चमक दाखवली. अर्शदीप सिंगचा विक्रमी स्पेल आणि सूर्यकुमार यादवच्या या विश्वचषकातील पहिले अर्धशतक यांच्या जोरावर टीम इंडियाने अमेरिकेला पराभूत केलं. या विजयानंतर टीम इंडिया उलटफेर करण्यापासून रोखलं आहे. भारताच्या या विजयानंतर सुपर-८ मध्ये पोहोचण्याच्या पाकिस्तानच्या आशा कायम आहेत, पण अमेरिका पॉईंटटेबलमध्ये अजूनही चांगल्या स्थितीत आहे.

भारताने ७.३ षटकांत ४४ धावांत ३ विकेट गमावल्या होत्या. या टी२० मध्ये काहीतरी उलटफेर पुन्हा होणार असा धोका निर्माण झाला होता. विराट कोहली आणि रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मैदानात शिबम दुबे आणि सूर्यकुमार यादव उभे होते. परंतु हे दोघेही मागील दोन सामन्यांमध्ये अपयशी ठरले होते. यामुळे भारतीय चाहत्यांची धाकधूक वाढली होती.

टीम इंडियाप्रमाणे शिवम दुबेसाठी हा सामना वैयक्तिकरित्या महत्त्वाचा होता. संधी समजत सूर्याकुमार आणि दुबे यांनी उत्तम खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. अर्धशतक ठोकणाऱ्या सूर्याला जीवनदान देणं अमेरिकेला महागात पडलं. सूर्याने ४९ चेंडूत नाबाद ५० धावा करत संघाला विजय मिळवून दिला. शिवम दुबेनेही ३१ धावांची नाबाद खेळी खेळली. त्याने सूर्यासोबत ६७ धावांची मॅचविनिंग भागीदारी केली.

या सामन्यात दोन्ही संघांच्या डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजांनी सुरुवातीचे विकेट घेतल्या. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने पहिल्याच चेंडूवर सलामीवीर शायन जहांगीरला एलबीडब्ल्यू आऊट केले. त्यानंतर ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर आंद्रे गॉसलाही पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. या दोन विकेटनंतर अमेरिकेच्या धावासंख्येचा वेग मंदावला. डाव सावरण्यासाठी अमेरिकेला संघर्ष करावा लागला. पण तितक्यात आठवी ओव्हर टाकणाऱ्या हार्दिक पंड्याने कर्णधार आणि स्टार फलंदाज आरोन जोन्सला बाद करत अमेरिकाला मोठा धक्का दिला.

IND vs USA T20 World Cup: अमेरिकेला नमवत टीम इंडियाची सुपर ८ मध्ये धडक,  ७ विकेट राखून दणदणीत विजय
Mohammad Rizwan Record: मोहम्मद रिझवानने T20I मध्ये रचला इतिहास! मोठ्या रेकॉर्डमध्ये थेट रोहित शर्माशी बरोबरी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com