भारतीय संघाचं गंभीर पर्व सुरू झालं आहे. राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर गौतम गंभीरने मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांचा कार्यकाळ २०२४ टी -२० वर्ल्डकप स्पर्धेपर्यंत होता. तर गौतम गंभीर २०२७ वर्ल्डकपपर्यंत भारतीय संघासोबत असणार आहे. दरम्यान पहिल्याच दौऱ्यावर गौतम गंभीरने काही धक्कादायक निर्णय घेतले आहेत. कोणते आहेत ते निर्णय? जाणून घ्या.
टी -२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी रोहित शर्माची कर्णधार आणि हार्दिक पंड्याची उप कर्णधार म्हणून निवड करण्यात आली होती. रोहितने कर्णधारपद सोडल्यानंतर ही जबाबदारी हार्दिक पंड्याला मिळणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र निवडकर्त्यांनी टी -२० संघाची जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे सोपवली आहे. यासह हार्दिक पंड्याचं उपकर्णधारपदही काढून घेण्यात आलं आहे. वनडे संघाची जबाबदारी अजूनतरी रोहितकडेच आहे. मात्र उप कर्णधारपदाची जबाबदारी शुभमन गिलकडे सोपवण्यात आली आहे.
गौतम गंभीर आणि निवडकर्त्यांनी घेतलेला आणखी एक धाडसी निर्णय म्हणजे ऋतुराज गायकवाडला संघात स्थान न देणं. झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या मालिकेत त्याला ४ सामने खेळण्याची संधी मिळाली. या चारही सामन्यांमध्ये त्याने शानदार फलंदाजी केली. त्याने यादरम्यान १३३ धावा केल्या. मात्र तरीदेखील त्याला टी -२० संघात स्थान देण्यात आलेलं नाही.
आयपीएल २०२४ स्पर्धा गाजवणाऱ्या अभिषेक शर्माला झिम्बाब्वे विरुध्दच्या टी -२० मालिकेत स्थान दिलं गेलं होतं. या मालिकेतील पहिल्या सामन्यात शून्यावर बाद झाल्यानंतर दुसऱ्याच सामन्यात त्याने शतकी खेळी केली होती. दरम्यान त्यानंतरही त्याने महत्वाची खेळी केली. मात्र त्याला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आलेलं नाही.
भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने टी -२० वर्ल्डकप स्पर्धेनंतर टी -२० क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्याने वनडे आणि कसोटी खेळणं सुरू ठेवणार असं म्हटलं होतं. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत विराट आणि रोहित कमबॅक करणार आहेत. मात्र रविंद्र जडेजाला या मालिकेतून डच्चू देण्यात आला आहे.
नुकतेच भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात टी -२० मालिका पार पडली. या मालिकेत पूर्णपणे फ्लो ठरलेल्या रियान परागची भारतीय टी -२० संघात निवड करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.