

कोलकातामध्ये पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेकडून भारताचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर गुवाहाटीतील दुसऱ्या कसोटीत पराभवाचा वचपा काढतील अशी अपेक्षा होती. पण ती अपेक्षा पूर्णपणे फोल ठरली आहे. वचपा तर सोडाच, दुसरी कसोटी वाचवण्याचे मोठे आव्हान भारतीय 'अष्टपैलू' संघासमोर आहे. कोलकाताच्या 'फिरकी' फ्रेंडली पिचवर शरणागती पत्करणाऱ्या भारतीय फलंदाजांचा गुवाहाटीच्या पाटा पिचवरही निभाव लागू शकलेला नाही. परिणामी पहिल्याच डावात मार्को यान्सेनच्या घातक माऱ्यासमोर भारतीय धुरंधरांनी सपशेल नांगी टाकली. आता भारतावर पराभवाचं सावट आहे.
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मार्को यान्सेन यानं सोमवारी भारताविरुद्ध दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात घातक गोलंदाजी केली. त्यानं विकेट्सचा षटकार लगावला आणि दुसरा कसोटी सामना भारताच्या हाताबाहेर गेला. यान्सेननं गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये १९.५ षटकांत ४८ धावा देत सहा विकेट्स घेतल्या. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताचा डाव २०१ धावांवर आटोपला. दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या डावात ४८९ धावांचा डोंगर उभारला होता. पाहुण्या संघाला २८८ धावांची मजबूत आघाडी मिळाली. पण दक्षिण आफ्रिकेनं भारताला फॉलोऑन देणं टाळलं आणि स्वतःच फलंदाजीला येण्याचा निर्णय घेतला.
यान्सेनने गुवाहाटीत फलंदाजीसह गोलंदाजीतही कमाल दाखवली. सहा विकेट्स घेण्यासह त्यानं ९३ धावाही कुटल्या. २५ वर्षांनंतर एखाद्या दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूनं कसोटीत सहा विकेट्स आणि ५० पेक्षा अधिक धावा करण्याचा कारनामा केलाय. १९८८ नंतर यान्सेन हा भारतात कसोटी सामन्यात पाच किंवा त्यापेक्षा अधिक विकेट घेणारा तिसरा डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज ठरला आहे. याआधी झहीर खान यानं तीन वेळा, मिचेल जॉनसन यानं २०१० मध्ये अशी कामगिरी केली होती. एक वेळ अशी होती की, भारताच्या १ बाद ९५ धावा होत्या. त्यानंतर अवघ्या २७ धावांत भारतानं सहा विकेट्स गमावले. बहुतांश फलंदाजांनी चुकीचे फटके मारून आयती विकेट दिली. यशस्वी जयस्वालनं सर्वाधिक ५८ धावा केल्या. तर वॉशिंग्टन सुंदर यानं ४८ धावांची खेळी केली.
दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना मायभूमीतच गारद केले. भारताचे फलंदाज वेगवान माऱ्यासमोरही तग धरू शकले नाहीत. याशिवाय फिरकीपुढेही त्यांनी नांगी टाकली. भारतीय संघात कसोटी स्पेशालिस्ट नसणे हेही एक कारण आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यानं कसोटी संघात बॅटिंग स्पेशालिस्टऐवजी ऑलराउंडर्सवर अधिक भरवसा दाखवला. जडेजा, रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर हे तीन ऑलराउंडर संघात आहेत. नितीश रेड्डीचा तर गोलंदाजीतही काही विशेष असा वापर करून घेतला नाही. तर बॅटिंगमध्येही तो फेल ठरला. याआधी स्पेशालिस्ट खेळाडूंवर अधिक भर दिला जात असे. त्याचा फायदाही होत असे. पण आता याउलट होत आहे. ऑलराउंडर्सना गोलंदाजी आणि फलंदाजीतही कमाल दाखवता आलेली नाही.
प्रत्येक संघ हा टॅलेंटेड खेळाडू आणि युवा खेळाडूंवर अधिक भरवसा ठेवतो, पण तो किती असावा हे देखील बघणे गरजेचे आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारासारख्या खेळाडूंना बॅटिंग स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जायचे. या चारही खेळाडूंनी ८० पेक्षा जास्त कसोटी सामने खेळलेले होते. पण आता ते संघात नसल्यानं युवा खेळाडूंवर ताण आला आहे. क्वालिटी गोलंदाजीसमोर या युवा खेळाडूंचा अनुभव कमी असल्यानं निभाव लागू शकत नाही, असे अनिल कुंबळेसारखे दिग्गज खेळाडूही सांगतात.
सध्याच्या टीम इंडियातील खेळाडू पूर्णपणे टेस्ट स्पेशालिस्ट नाहीत. साई सुदर्शन यानं व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये धावा केल्या असल्या तरी डोमेस्टिक क्रिकेटचा त्याला खूप काही अनुभव नाही. ध्रुव जुरेल सुद्धा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये फारसा अनुभवी नाही. वॉशिंग्टन सुंदरबाबतही तेच म्हणावे लागेल. करुण नायर, सरफराज खान, अभिमन्यू ईश्वरनम यांसारख्या खेळाडूंनी भारतीय खेळपट्ट्यांवर खूप धावा केल्या आहेत. पण त्यातील एकही सध्याच्या संघात नाही. त्यामुळे आगामी काळात संघ व्यवस्थापनाला टेस्ट स्पेशालिस्ट फलंदाज हेरावे लागतील, अन्यथा भविष्यात भारतीय कसोटी संघाचा निभाव लागणे कठीण होणार आहे, असेही क्रिकेटमधील तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.