मुंबई: आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर भारतीय टी-२० संघात स्थान मिळाल्यानंतर अष्टपैलू खेळाडू दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) यानं संधीचं सोनं केलं. दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या चौथ्या सामन्यात दिनेश कार्तिकनं विस्फोटक फलंदाजी करताना, २७ चेंडूंमध्ये ५५ धावा कुटल्या.
या तुफानी अर्धशतकी खेळीमुळं भारतानं दक्षिण आफ्रिकाविरुद्ध विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधली. तसेच दिनेश कार्तिकनं एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (Cricket) अर्धशतक करणारा तो सर्वात वयस्कर भारतीय फलंदाज ठरला.
कार्तिक हा ३७ वर्षांचा आहे. त्याने ३६ व्या आंतरराष्ट्रीय टी - २० सामन्यात खेळताना आपलं पहिलं अर्धशतक झळकावलं. टी-२० क्रिकेट खेळायला सुरुवात केल्यानंतर तब्बल १६ वर्षांनी त्यानं हे अर्धशतक ठोकलं आहे. दिनेश कार्तिकने राजकोटमध्ये सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये चौथ्या सामन्यात अखेरच्या काही षटकांमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) गोलंदाजांची जोरदार धुलाई केली.
अखेरच्या षटकांत तुफानी फटकेबाजी करताना त्याने अवघ्या २७ चेंडूंमध्ये ५५ धावांची सुरेख खेळी केली. कार्तिकने दोनशेहून अधिकच्या स्ट्राइक रेटने २ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने अर्धशतक केलं.
हार्दिक पंड्यासमवेत ६५ धावांची भागीदारी
दिनेश कार्तिकने बहारदार फलंदाजी करतानाच उपकर्णधार हार्दिक पंड्याच्या साथीने ६५ धावांची महत्वाची भागीदारी केली. दोघांनी अखेरच्या ५.३ षटकांमध्ये धावांचा रतीब घालून टीम इंडियाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली.
टीम इंडियाने पहिल्या १० षटकांत अवघ्या ५६ धावा केल्या. तर अखेरच्या दहा षटकांत ११३ धावा कुटल्या. कार्तिक आणि हार्दिकने अखेरच्या षटकांत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवून धावा वसूल केल्या.
कार्तिकने गोलंदाज ड्वेन प्रिटोरियसच्या चेंडूवर षटकार खेचला. या षटकारासह त्याने आपलं पहिलं अर्धशतक झळकावलं. कार्तिकने २७ चेंडूंमध्ये ५५ धावा केल्या. त्याने या खेळीसह भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचा विक्रम मोडीत काढला. धोनीने २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना ३६ व्या वर्षी टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात दुसरं अर्धशतक लगावलं होतं. हा विक्रम आता कार्तिकने मोडला आहे. (T-20 Cricket)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.