
भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना अॅडलेड ओव्हलच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाचा डाव अवघ्या १८० धावांवर आटोपला.
दरम्यान ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात फलंदाजी करताना, मार्नस लाबुशेनने ऑस्ट्रेलियाला मजबूत स्थितीत पोहोचवलं. दरम्यान नितीश रेड्डीने त्याला बाद करत माघारी धाडलं. त्याला बाद करण्यासाठी यशस्वी जयस्वालने शानदार झेल घेतला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
मार्नस लाबुशेनने भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला, लाबुशेनने पहिला दिवस खेळून काढला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहिल्या सेशनमध्येही त्याने चांगली फलंदाजी केली. मात्र नितीश कुमार रेड्डीने त्याला बाद करत माघारी धाडलं. तर झाले असे की, भारतीय संघाकडून ५६ वे षटक टाकण्यासाठी नितीश कुमार रेड्डी गोलंदाजीला आला होता.
या षटकातील तिसरा चेंडू, नितीशने ऑफ साईडच्या बाहेरच्या दिशेने टाकला, जो टप्पा पडताच बाहेर निघाला. या चेंडूवर लाबुशेनने कट शॉट मारण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू सरळ जयस्वालच्या हातात गेला.
हा चेंडू वेगाने जात होता. मात्र जयस्वालने कुठलीही चूक केली नाही. त्याने दोन्ही हातांनी शानदार झेल घेतला. या झेलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
या सामन्यातील पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने शानदार सुरुवात केली आहे. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने १ गडी बाद ८६ धावा केल्या होत्या. मार्नस लाबुशेन नाबाद परतला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहिल्या सेशनमध्येही त्याने चांगली सुरुवात केली. या डावात फलंदाजी करताना त्याने ९ चौकारांच्या साहय्याने ६४ धावांची खेळी केली.
भारतीय संघाबद्दल बोलायचं झालं, तर या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना नितीश कुमार रेड्डीने सर्वाधिक ४२ धावांची खेळी केली. तर केएल राहुलने ३७, शुभमन गिलने ३१ आणि रिषभ पंतने २१ धावांची खेळी केली. भारतीय संघाचा डाव १८० धावांवर आटोपला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.