
आयसीसीनं (ICC) बुधवारी खेळाडूंची रँकिंग (Ranking) प्रसिद्ध केली. या रँकिंगच्या यादीत मोठा उलटफेर झाला आहे. झिम्बाब्वेचा अनुभवी अष्टपैलू क्रिकेटपटू सिकंदर रझा यानं रँकिंगमध्ये अव्वल स्थानी झेप घेतली आहे. तो जगातील क्रमांक एकचा वनडे ऑलराउंडर ठरला आहे. त्याच्या खात्यात ३०२ रेटिंग पॉइंट आहेत.
सिकंदर रझा यानं अफगाणिस्तानचा ऑलराउंडर मोहम्मद नबी (२९२ गुण) आणि अजमतुल्लाह उमरजई (२९६ गुण) यांना मागे टाकत अव्वल स्थान पटकावलं आहे. नबी हा तिसऱ्या, तर अजमतुल्ला दुसऱ्या स्थानी घसरला आहे.
सिकंदरने अलीकडेच श्रीलंका संघाविरुद्ध दोन वनडे सामन्यांच्या मालिकेत ९२ धावा आणि नाबाद ५९ धावांची खेळी केली होती. त्यात त्याने एक विकेटही घेतला. दुसरीकडे फलंदाजांच्या ताज्या क्रमवारीतही रझानं झेप घेतली आहे. ९ स्थानांची सुधारणा झाली असून, तो २२ व्या क्रमांकावर पोहोचला आहे.
हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये झिम्बाब्वेच्या विरुद्ध झालेल्या दोन्ही सामन्यांत श्रीलंकेनं बाजी मारली. खेळाडूंचीही कामगिरी उंचावली असून, श्रीलंकेच्या खेळाडूंनी क्रमवारीतही झेप घेतली आहे. पथुम निसांका (६५४ गुण) यानं फलंदाजी क्रमवारीत सात पावलं पुढे टाकत १३ व्या पायरीवर म्हणजेच १३ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने या मालिकेत १२२ आणि ७६ धावांची खेळी केली होती.
जनिथ लियानागे याची क्रमवारीत १३ स्थानांनी सुधारणा होऊन तो २९ व्या स्थानी पोहोचला आहे. गोलंदाजी क्रमवारीत असिथ फर्नांडो ३१ व्या स्थानी, दिलशान मदुशंका याच्या स्थानात आठने सुधारणा होऊन तो ५२ व्या स्थानी पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू केशव महाराज हा ताज्या वनडे क्रमवारीनुसार क्रमांक एकवर पोहोचला आहे. त्याने इंग्लंडच्या विरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात ४ विकेट घेतल्या. त्याचे ३१ गुण वाढले असून, एकूण ६९० गुण झाले आहेत. भारताचा शुभमन गिल फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या स्थानी आहे. त्याचे ७८४ अंक आहेत.
मोहम्मद नबीचं वनडे रँकिंगमध्ये नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे अफगाणिस्तानचा खेळाडू टी २० ऑलराउंडर्सच्या रँकिंगमध्ये हार्दिक पंड्याच्या नजीक पोहोचला आहे. नबी हा २३१ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. हार्दिक पंड्या हा तिसऱ्या स्थानी आहे. त्याचे २५२ गुण आहेत. नबी यानं शारजाहमध्ये गेल्या आठवड्यात तीन सामन्यांत चार विकेट घेतल्या होत्या.
अफगाणिस्तान सध्या यूएईमध्ये टी २० आंतरराष्ट्रीय तिरंगी मालिका खेळत असून, त्यात पाकिस्तान संघही आहे. अफगाणिस्तानच्या इब्राहिम जादरान यानं दोन अर्धशतके तडकावल्यानंतर क्रमवारीत फायदा झाला आहे. १२ स्थानांनी झेप घेत तो थेट २० व्या स्थानी पोहोचला आहे. पाकिस्तानच्या सूफियान मुकीम यानं टी २० गोलंदाजी क्रमवारीत ११ स्थानांनी झेप घेत २२ वे स्थान पटकावले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.