DC vs SRH Match Result: आयपीएलच्या १६ व्या हंगामातील ४० वा सामना दिल्ली कॅपिटल आणि सनराईजर्स हैदराबाद संघात झाला. श्वास रोखून धरायला लावणाऱ्या या सामन्यात हैदराबादने दिल्लीवर ९ धावांनी विजय मिळवला.
प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने दिल्लीपुढे विजयासाठी १९८ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीचा संघ निर्धारित २० षटकात ६ गड्यांच्या मोबदल्यात १८८ धावाच करू शकला. हैदराबादचा हा सलग दुसरा विजय आहे.
मयंक मार्कंडेय हा हैदराबादच्या विजयाचा हिरो ठरला. त्याने योग्यवेळी २ विकेट्स काढत हैदराबादच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. सनराईजर्स हैदराबादने आपल्या घरच्या पराभवाचा बदला दिल्लीच्या होम ग्राऊंडवर घुसून घेतला.
हैदराबादने दिलेल्या १९८ धावांचा पाठलाग करताना दिल्लीची सुरूवात अत्यंत खराब झाली होती. भुवनेश्वर कुमारने पहिल्याच षटकात वार्नरला बाद केलं. वार्नरला भोपळाही फोडता आला नाही. वार्नर बाद झाल्यानंतर मिचेल मार्श आमि फिल्प सॉल्टने सनराईजर्स हैदराबादच्या एकेका गोलंदाजाची धुलाई करण्यास सुरूवात केली.
या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ११२ धावांची दमदार भागीदारी रचत हैदराबादच्या गोटातील वातावरण टाईट केलं. सॉल्टने ३५ चेंडूत ५९ धावा कुटल्या. आज त्याच्या बॅटमधून चौकारांची बरसातच झाली. त्याने ९ चौकार मारले.
दरम्यान, तितक्याच आक्रमकतेने साथ देणाऱ्या मिचेल मार्शने षटकारांचा पाऊस पाडला. त्याने देखील आपल्या अर्धशतकी खेळीत ५ षटकार मारले होते. अखेर ही जोडी मार्कंडेयने फोडली. त्याने सॉल्टला ५९ धावांवर बाद केले. पाठोपाठ अभिषेक शर्माने मनिष पांडेला १ धावेवर बाद करत दिल्लीला तिसरा धक्का दिला.
दिल्लीला विजयसाठी ४१ चेंडूत ७३ धावांची गरज असताना सेट झालेला मिचेल मार्श ६३ धावा करून बाद झाला. त्याला अकिल हुसैनने बाद केले. यानंतर दिल्लीची गाडी रूळावरून घसरली. प्रियम गर्ग १२ तर सर्फराज खान ९ धावा करून बाद झाला.
अखेरच्या काही षटकात अक्षर पटेलने फटकेबाजी केली. मात्र, तो संघाला विजय मिळवून देण्यास अपयशी ठरला. अखेर दिल्लीचा ९ धावांनी पराभव झाला. हैदराबादकडून मार्कंडेयने २ गड्यांना बाद केलं. तर भुवनेश्वर, नटराजन, अकिल हुसेन आणि अभिषेक शर्माने प्रत्येकी १ विकेट घेतली.
तत्पुर्वी प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी करणाऱ्या सनराईजर्स हैदराबादच्या फक्त दोन फलंदाजांनी दिल्ली कॅपिटल्सला जेरीला आणले. सलामीवीर अभिषेक शर्मा (६७ धावा) आणि हेन्रिच क्लासेनने (५३ धावा) अर्धशतकी खेळी करत हैदराबादला २० षटकात ६ बाद १९७ धावांपर्यंत पोहचवले. दिल्लीकडून मिचेल मार्शने भेदक मारा करत ४ फलंदाज बाद केले.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.