
आयसीसी विमेंस वर्ल्डकप २०२५ सुरू होण्यास आता ५० दिवस शिल्लक आहेत. या स्पर्धेच्या सुरुवातीच्या काही दिवसांपूर्वी ११ ऑगस्ट रोजी मुंबईत वर्ल्डकप ट्रॉफीचं अनावरण करण्यात आलं. या कार्यक्रमात आयसीसी अध्यक्ष जय शाह, भारतीय महिला टीमची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि भारतीय पुरुष संघाचा माजी अनुभवी खेळाडू युवराज सिंगसह अनेक खेळाडू उपस्थित होते.
आयसीसी विमेंस वर्ल्डकप २०२०५ हा ३० सप्टेंबरपासून सुरू होणार आहे आणि अंतिम सामना २ नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. क्रिकेटमधील दिग्गज मिताली राज आणि युवराज सिंग हे मुंबईत झालेल्या एका भव्य कार्यक्रमातील विशेष पॅनेल चर्चेचा भाग होते. ‘आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५’साठी ‘५० दिवस बाकी’ मोहिमेला प्रारंभ करण्यात आला आणि ट्रॉफी टूरलाही हिरवा कंदील मिळाला.
कार्यक्रमाची सुरुवात आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांच्या हस्ते झाली. पॅनेल चर्चेत भारतीय संघातील हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांच्यासोबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) मुख्य कार्यकारी अधिकारी संजोग गुप्ता देखील उपस्थित होते.
या कार्यक्रमावेळी जय शाह म्हणाले, “आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकप २०२५ भारतात परत येणार आहे. हे महिलांच्या क्रिकेटसाठी एक निर्णायक क्षण आहे. या स्पर्धेमुळे खेळाचा जागतिक दर्जा आणखी उंचावेल. आयसीसी नेहमीच नव्या कल्पनांसाठी खुलं असून महिलांच्या क्रिकेटच्या प्रगतीसाठी नवे मार्ग शोधत असतं. अशा चर्चांमुळे सामूहिक दृष्टिकोन तयार होतो आणि प्रगतीला गती मिळते.
फक्त ५० दिवसांवर आलेल्या या स्पर्धेसाठी तयारी जोमात सुरू आहे आणि उत्साहही वाढतेय. सर्व सहभागी टीम्सना माझ्या शुभेच्छा. मला खात्री आहे की त्यांना भारत आणि श्रीलंकेत अविस्मरणीय अनुभव मिळेल, असंही जय शाह म्हणालेत.
ही स्पर्धा ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या आठ संघांमध्ये राउंड-रॉबिन पद्धतीने खेळवली जाणार आहे. २०१६ साली भारतात महिला टी२० वर्ल्डकप झाल्यानंतर उपखंडात होणारी ही पहिली महिलांची जागतिक स्पर्धा असेल. याआधी भारताने १९७८, १९९७ आणि २०१३ साली महिलांचा विश्वचषक आयोजित केला आहे.
ट्रॉफीच्या अनावरण कार्यक्रमात भारतीय महिला क्रिकेट टीमची कर्णधार हरमनप्रीत कौरने वर्ल्ड कप जिंकण्याचा ठाम निर्धार व्यक्त केलाय. तिने सांगितले की, ती आणि तिची टीम आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कपमधील ‘विजयाचा दुष्काळ’ संपवण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत. या स्पर्धेसाठी संघ जोरदार तयारी करत आहे.
हरमनप्रीत म्हणाली, “आम्हाला यावेळी ट्रॉफी जिंकण्याच्या प्रतीक्षेला पूर्णविराम द्यायचा आहे. वर्ल्ड कप नेहमीच खास असतात आणि मला देशासाठी काहीतरी विशेष करून दाखवायचंय. जेव्हा मी युवराजला पाहते, तेव्हा मला नेहमीच मोठी प्रेरणा मिळते.”
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.