

वानखेडे स्टेडियमवर झालेल्या टी20 मुंबई 2026 लीगच्या अंतिम सामन्यात क्रिकेटचा थरार पाहायला मिळाला. मात्र यासोबतच मैदानावर मोठा ड्रामाही रंगल्याचं दिसून आलं. आर्क्स अंधेरी आणि मराठा रॉयल्स यांच्यात झालेल्या या खिताबी लढतीत शेवटपर्यंत प्रेक्षकांची उत्सुकता कायम राहिली.
दुसऱ्या डावाच्या 19व्या ओव्हरमध्ये सामन्याचं वातावरण अचानक तापल्याचं दिसून आलं. आर्क्स अंधेरीचा फलंदाज गौरव जठार आणि मराठा रॉयल्सचा खेळाडू रोहन राजे यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर गौरवने शानदार सिक्स लगावला. पण त्याच ओव्हरच्या पुढच्या बॉलवर इरफान उमैरने त्याचा विकेट घेतला. बाद झाल्यानंतर तो पॅव्हेलियनकडे परतत असताना डगआउटजवळ उभ्या असलेल्या रोहन राजेशी त्याची शाब्दिक चकमक झाली.
प्रकरण इतकं वाढलं की, चौथ्या अंपायरला दोघांना वेगळं करावं लागलं. गौरव आऊट झाल्यानंतर मराठा रॉयल्सच्या खेळाडूंनी आक्रमक सेलिब्रेशन सुरू केलं. दरम्यान हे सेलिब्रेशन गौरवला आवडलं नाही आणि तीव्र नाराजी व्यक्त केली. मराठा रॉयल्सचा वेगवान बॉलर तुषार देशपांडे आणि गौरव यांच्यातही वाद झाला. दरम्यान फायनल मॅचचं गांभीर्य लक्षात घेऊन मैदानावरील इतर खेळाडूंनी आणि अंपायारने त्वरित मध्यस्थी करत हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.
सामन्याच्या शेवटच्या ओव्हरमध्ये मराठा रॉयल्सने विजय मिळवला. सिद्धेश लाडच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मराठा रॉयल्सने पहिल्यांदा फलंदाजी करत 5 विकेट गमावून 154 रन्स केले होते. यावेळी चिन्मय राजेश सुतारने उत्कृष्ट 61 रन्सची खेळी केली.
लक्ष्याचा पाठलाग करताना आर्क्स अंधेरीचा संघ 8 विकेट्स गमावून 146 रन्सपर्यंत मजल मारली. विजयासाठी शेवटच्या दोन ओव्हर्समध्ये 24 रन्सची गरज होती. पण 19व्या ओव्हरमध्ये 11 रन्स झाल्यानंतर शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त 5 रन्स मिळाले. त्यामुळे मराठा रॉयल्सने हा सामना 8 धावांनी जिंकत जेतेपद आपल्या नावावर केलं.
अंधेरी टीमकडून अर्जुन तेंडुलकरही खेळत होता. मात्र त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. त्याने 12 चेंडूत फक्त 2 रन्स करून तो बाद झाला. या सामन्यात गोलंदाजी करत शेवटची ओव्हर टाकणारा रोहन राजे हा 39 वर्षांचा अनुभवी खेळाडू आहे. तो याआधी मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये खेळला आहे. 2008 आणि 2009 मध्ये त्याने 10 सामने खेळले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.