गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक कोण होणार? अशी चर्चा सुरु होती. अखेर बीसीसीआयने नव्या मुख्य प्रशिक्षकाची घोषणा केली आहे. राहुल द्रविडनंतर गौतम गंभीर भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी पार पाडणार आहे. आतापर्यंत राहुल द्रविड यांनी ही जबाबदारी योग्यरित्या पार पाडली.
राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेची ट्रॉफी उंचावली. एकीकडे राहुल द्रविड शांत, तर दुसरीकडे गौतम गंभीर आपल्या आक्रमक भूमिकेसाठी ओळखला जातो. दरम्यान मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर गौतम गंभीरसमोर कोणती आव्हानं असणार आहेत? जाणून घ्या.
यापू्र्वी गौतम गंभीरने कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स संघासाठी मार्गदर्शकाची भूमिका बजावली आहे. यादरम्यान त्याने अनेक धक्कादायक निर्णय घेतले होते. गंभीर आपल्या रोखठोक निर्णयांमुळे देखील ओळखला जातो. जे खेळाडू् त्याच्या मार्गदर्शनाखाली खेळले आहेत, त्यांना गंभीरच्या कामाची पद्धत माहित आहे, मात्र संघातील आणखी काही खेळाडू देखील आहेत, ज्यांना गंभीरसोबत काम करण्याचा अनुभव नाही. गंभीर या खेळाडूंसह कसं जुळवून घेणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा झाल्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्माने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहितनंतर भारतीय संघाला नव्या कर्णधाराची गरज आहे. या पदासाठी हार्दिक पंड्याला प्रबळ दावेदार मानलं जात आहे. मात्र फलंदाजीत या दोघांची रिप्लेसमेंट शोधून काढणं हे गौतम गंभीरसमोरील सर्वात मोठं आव्हान असणार आहे.
भारतीय संघाने गेल्या काही वर्षांत कसोटी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. आतापर्यंत हा संघ अव्वल स्थानी होता. मात्र सध्या भारतीय संघ दुसऱ्या स्थानी आहे. भारतीय संघाने सलग २ वेळेस आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. मात्र दोन्ही वेळेस या संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. यावेळी भारतीय संघाला फायनलमध्ये जाण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. दरम्यान गंभीरच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ कसोटीत कशी कामगिरी करतो, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.