

इंग्लंड क्रिकेट टीमचा स्टार ऑलराऊंडर आणि कर्णधार बेन स्टोक्स सध्या एका नाईटक्लबमधील मारामारीमुळे चर्चेत आलाय. नाइटक्लबबाहेरील या प्रकारामुळे क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डने या प्रकरणाची चौकशी सुरू केलीये.
मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये बेन स्टोक्स आणि इंग्लंडचा वेगवान गोलंदाज Gus Atkinson हे दोघं नाइटक्लबबाहेर रस्त्यावर एका रग्बी खेळाडू आणि त्याच्या सहकाऱ्यांसोबत वाद घालताना दिसतायत. यावेळी दोन्ही बाजूंमध्ये जोरदार बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं.
या झटापटीदरम्यान मारहाणीची स्थिती निर्माण झाल्याचा दावा केला जातोय. या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीला जमिनीवर पडल्याचंही दिसतंय. त्यामुळे आता इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स चांगलाच अडचणीत सापडल्याचं पाहायला मिळतंय.
ही घटना रविवारी रात्री घडल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे याच घटनेच्या काही तास आधी इंग्लंड संघाने लॉर्ड्समध्ये झालेल्या पहिल्या टेस्ट सामन्यात न्यूझीलंडवर 115 रन्सने विजय मिळवला होता. या विजयानंतर टीममधील खेळाडू साजरा करण्यासाठी नाइटक्लबमध्ये गेले होते आणि तिथेच हा वाद उद्भवला असल्याची माहिती समोर आली आहे.
या संपूर्ण प्रकरणावर इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डने अधिकृत भूमिका घेत तपास सुरू केलाय. बोर्डने सांगितलं की, न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टनंतर टीमच्या प्रोटोकॉलचं उल्लंघन झालं आहे का याची सखोल चौकशी केली जातेय.
स्टोक्स आणि अॅटकिन्सन हे सोमवारी पहाटे त्या नाइटक्लबमध्ये उपस्थित असल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय. यासंदर्भातील अधिकची माहिती गोळा केली जात असून योग्य वेळी पुढील निर्णय घेतला जाईल, असंही ECB कडून सांगण्यात आलंय. त्याचप्रमाणे ही माहिती क्रिकेट रेग्युलेटरलाही देण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणावर माजी इंग्लंड वेगवान गोलंदाज स्टीव्ह हार्मिसन यांनी स्टोक्सची बाजू घेतलीये. त्यांनी म्हटलंय की, संपूर्ण सत्य समोर येईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही. हार्मिसन यांच्या मते, बेन स्टोक्स एक उत्कृष्ट खेळाडू आणि प्रामाणिक व्यक्ती आहे. परिस्थितीची पूर्ण माहिती मिळाल्यावरच योग्य निर्णय घ्यावा, असं त्यांनी स्पष्ट केले.
त्यांनी पुढे असंही सांगितलंय की, ते स्टोक्सला अनेक वर्षांपासून ओळखतात आणि त्यांना विश्वास आहे की तो परिस्थितीनुसार योग्य निर्णय घेईल. जर त्याच्याकडून काही चूक झाली असेल, तर तो स्वतःही ती स्विकारेल आणि योग्य पाऊल उचलेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.