
आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान १४ सप्टेंबर रोजी दुबईमध्ये आमनेसामने येतील. ऑपरेशन सिंदूर नंतर दोन्ही संघ पहिल्यांदाच भिडणार आहेत. पूर्ण देशभरातून या सामन्याला विरोध दर्शवला जात आहे, तर सामना रद्द करण्याची मागणी देखील केली जात आहे.आशिया कपचे वेळापत्रक जाहीर झाल्यापासून भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्याला विरोध केला जात आहे. सोशस मीडियासह, राजकीय पक्ष देखील या सामन्याचा तीव्र निषेध करत आहे. परंतु, हा सामना रद्द करण्याचा निर्णय बीसीसीआयच्या हातात आहे का, यासाठी काय आहेत नियम, जाणून घेऊयात.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रद्द होणार?
भारत-पाकिस्तान सामना रद्द करण्याचा निर्णय बीसीसीआयच्या हातात नाही. या संदर्भात, बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, आशिया कपबाबत भारत सरकार जो काही निर्णय घेईल त्याचे बोर्ड पालन करेल.
पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्यावरुन याआधीही विरोध करण्यात आला आहे. राजकीय पक्ष असो की माजी क्रिकेटर यांनी पाकिस्तानसोबत क्रिकेट न खेळण्याची भूमिका घेतली. देशावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्याबाबत एक नवीन धोरण लागू केले होते. त्या धोरणात असे म्हटले होते की, भारतीय संघ बहुपक्षीय स्पर्धांमध्ये पाकिस्तानसोबत खेळेल, परंतु त्यांच्यासोबत कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळणार नाही. भारत-पाकिस्तानचा सामना बीसीसीआय रद्द करणार का यावर भाजपचे अनुराग ठाकूर म्हणाले की आशिया कप सामना रद्द करायचा की नाही हा निर्णय पूर्णपणे भारत सरकारच्या हातात आहे.
देशभरातून बीसीसीआयवर जोरदार टीका
सोशल मीडियावर बीसीसीआयवर जोरदार टीका होत आहे. सामना रद्द करण्याची मागणी केली जात आहे. यादरम्यान, भारताचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादवचा एक व्हिडिओ समोर आला. यामध्ये तो पाकिस्तानी कर्णधार सलमान अली आगासोबत हस्तांदोलन करत होता. यासाठी सूर्यकुमार यादवला ट्रोल करण्यात आले. भारत-पाकिस्तान सामन्यावरून विरोधी पक्षांनीही केंद्र सरकारवर टीका केली आहे. सामना रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती, परंतु उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. या सामन्याचा तीव्र निषेध केला जात असून त्याचा परिणाम आता या सामन्यावरही जाणवू लागला आहे. वृत्तानुसार, या सामन्याच्या तिकिटांची विक्री ५० टक्क्यांपेक्षा कमी झाली आहे.