Asia Cup Final : पावसामुळं भारत-पाकिस्तान फायनलचा सामना रद्द झाला तर कोण ठरणार चॅम्पियन? जाणून घ्या नियम

India vs Pakistan Final : भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया चषक स्पर्धेतील फायनलचा सामना होणार आहे. मात्र, या सामन्यादरम्यान पाऊस पडला किंवा इतर कोणत्याही कारणानं सामना रद्द झाला तर, या सामन्याचा निकाल काय असेल?
भारत-पाकिस्तान सामन्यात पाऊस पडला तर कोण होणार चॅम्पियन?
Asia Cup 2025 Final, India vs Pakistan who will lift tropy saam tv
Published On
Summary
  • आशिया कप २०२५ स्पर्धेत भारत-पाकिस्तान तिसऱ्यांदा भिडणार

  • फायनलचा सामना रविवारी २८ सप्टेंबरला होणार

  • सामन्यावेळी पाऊस पडला तर कोण ठरणार विजेता?

भारत आणि पाकिस्तान सामना म्हणजे क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी, त्यात फायनलचा सामना म्हणजे सोन्याहून पिवळं...आशिया कपमध्येही भारत-पाकिस्तान यांच्यात रविवारी, २८ सप्टेंबरला फायनल होणार आहे. आशिया कपमध्ये हे दोन्ही संघ पहिल्यांदाच फायनलमध्ये एकमेकांना भिडणार आहेत. या सामन्यात कोण जिंकणार याची उत्सुकता अवघ्या क्रिकेट जगताला लागलेली आहे.

भारतानं ग्रुप स्टेज आणि नंतर सुपर फोरच्या फेरीत पाकिस्तानला धूळ चारली होती. दोन्ही सामन्यात त्यांचं हवेत उडणारं अतिआत्मविश्वासाचं विमान भारताच्या धुरंधरांनी जमिनीवर आणलं होतं. आता फायनलमध्येही भारत-पाकिस्तान सामना होणार आहे. एकाच स्पर्धेत हे दोन्ही संघ तिसऱ्यांदा भिडणार आहेत. या सामन्यातील विजेता हा आशिया चॅम्पियन ठरणार आहे. पण या सामन्यात पाऊस पडला आणि सामना रद्द करावा लागला तर कोणाला चॅम्पियन ठरवलं जाईल, असा प्रश्न आहे.

पाऊस पडला तर काय आहे नियम?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील फायनलचा सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये होणार आहे. हवामानाचा अंदाज बघितला तर, २८ सप्टेंबरला दुबईत पावसाची कोणतीही शक्यता नाही. पण अन्य कोणत्या कारणाने २८ सप्टेंबरला फायनलचा सामना झाला नाही तर, तो रद्द होणार नाही. आशिया कप फायनलसाठी २९ सप्टेंबरला राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.

राखीव ठेवलेल्या दिवशी फायनल सामन्याचा निकाल कोणत्या कारणामुळं लागू शकला नाही तर, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांना संयुक्त विजेते म्हणून घोषित करण्यात येईल. पण राखीव ठेवलेल्या दिवशीही पावसाचा काही अंदाज नाही. त्यामुळे तशी वेळ येण्याची शक्यताही कमी आहे.

भारत - पाकिस्तान हेड टू हेड सामन्यांचे निकाल

आयसीसी किंवा इतर बहुपक्षीय स्पर्धांमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात पाच अंतिम लढती झाल्या आहेत. त्यातील दोन सामन्यांत भारताने विजय मिळवला आहे. तर तीन सामन्यांत पाकिस्तान विजयी ठरले आहेत. १९८५ मधील वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ क्रिकेट आणि २००७ मधील टी २० वर्ल्डकप स्पर्धेत भारताने पाकिस्तानला धूळ चारली होती. तर १९८६ आणि १९९४ मध्ये झालेल्या स्पर्धांमध्ये पाकिस्तानने भारताला पराभूत करून करंडकावर नाव कोरलं होतं. २०१७ मधील चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्ताननं विजय मिळवला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com