IND vs PAK Asia CUP 2023 Match: रविंद्र जडेजाचा भेदक मारा आणि रोहित शर्मा-शुभमन गिलच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरदावर टीम इंडियाने नेपाळविरुद्धच्या सामन्यात १० विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने आशिष चषक २०२३ स्पर्धेत सुपर-४ मध्ये प्रवेश केला आहे. आता भारताचा सामना पुन्हा पाकिस्तानशी होणार आहे. त्यामुळे चाहत्यांना या सामन्याची उत्सुकता लागली आहे. (Latest Marathi News)
सोमवारी पल्लेकेले स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रविंद्र जडेजा, मोहमद सिराजने केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर टीम इंडियाने नेपाळला २३० धावांत रोखलं. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या रोहित-शर्मा आणि शुभमन गिलने टीम इंडियाला चांगली सुरूवात करून दिली.
मात्र, सामन्यात पावसाने खोडा घातला. त्यामुळे टीम इंडियाला २३ ओव्हरमध्ये १४५ धावांचं सुधारित आव्हान मिळालं. टीम इंडियाच्या ओपनिंग जोडीनेच हे आव्हान २० षटकातच १० विकेट्स राखून पूर्ण केलं. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने नाबाद ७४ धावांची खेळी केली.
त्याचवेळी त्याचा सलामीचा जोडीदार शुभमन गिलने नाबाद ६७ धाव कुटल्या. या विजयासह टीम इंडिया आशिया कप २०२३ मध्ये ए ग्रुपमधून सुपर ४ मध्ये पोहचणारी दुसरी टीम (A2) ठरली आहे. तर त्याआधी पाकिस्तान (A1) हा मान मिळवला आहे.
दरम्यान, आता ए ग्रुपमधील हे दोन्ही संघ अर्थात पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया पुन्हा एकदा एकमेकांविरुद्ध दोन हात करणार आहेत. रविवारी १० सप्टेंबर रोजी हा सामना श्रीलंकेतील कोलंबो इथे पार पडणार आहे. याआधीच्या सामन्यात पावसामुळे पाकिस्तानला बॅटिंगची संधी मिळाली नव्हती. आता पुन्हा दोन्ही संघ आमने-सामने येणार असल्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
Edited by - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.