

Delhi man dies after falling into construction pit near home : राजधानी दिल्लीमध्ये ३० वर्षाच्या तरूणाचा बांधकामाच्या खड्ड्यात पडल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. १० मिनिटांत घरी येतो, असे म्हणालेला मुलगा घरी पोहचलाच नाही, काळाना घात घातला अन् कुटुंबाचा आधार नाहीसा झाला. पुनित कोहली असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. तो दिल्लीमधील एका खासगी बँकेच्या कॉल सेंटरमध्ये काम करत होता. काम झाल्यानंतर दुचाकीने तो उत्तम नगर येथील घरी निघाला होता. पण घराजवळ असलेल्या बांधकामासाठी खोदलेल्या १० बाय १४ च्या खड्ड्यात पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर स्थानिकांचा संताप अनावर झाला अन् प्रशासनाविरोधात निष्काळजीपणाचा आरोप केला.
५ फेब्रुवारी रोजी रात्री पुनितने आपल्या पत्नीला फोन करून सांगितले की, मी बँकेतून निघालो आहे आणि पुढच्या १० मिनिटात घरी पोहोचेन. पण घराजवळ अवघ्या २०० मीटर अंतरावर असताना तो दुचाकीसह खड्ढ्यात पडला अन् मृत्यू झाला. रस्ते बांधकामासाठी पुनीतच्या घराजवळच २० फूट खोल, १४ फूट लांब आणि १३ फूट रुंद खड्डा खांदण्यात आला होता. रात्रीच्या अंधारात पुनीतला खड्डा दिसला नाही, त्याची दुचाकी थेट खड्ड्यात कोसळली अन् होत्याचे नव्हते झाले.
त्या खड्ड्याभोवती कोणतेही बॅरिकेड्स, धोक्याची सूचना देणारे बोर्ड किंवा पुरेशी प्रकाशव्यवस्था नव्हती, असा आरोप कुटुंबियांनी केला. धक्कादायक म्हणजे, १० मिनिटात घरी पोहचतो असे सांगणारा पुनित घरी न पोहचल्याने कुटुंबीय चिंतेत होते. रात्रभर ते त्याचा शोध घेत होते. फोन लावत होते. पण कोणताही प्रतिसाद येत नव्हता. खोल खड्ड्यात पडल्यामुळे पुनित ८ तास आतमध्येच अडकला होता. त्याला कुणाचाही मदत मिळाली नाही. अंधार आणि खड्ड्याची खोली यामुळे कोणाचेही तिथे लक्ष गेले नाही. सकाळी जेव्हा काही स्थानिकांनी खड्ड्यात दुचाकी आणि एक मृतदेह पाहिला, तेव्हा ही घटना उघडकीस आली.
पुनित घरी एकटाच कमवता. त्याच्या घरी त्याची पत्नी आणि वृद्ध आई-वडील आहेत. कुटुंबियांकडून आधार गेल्याने संताप व्यक्त करण्यात आला. साधे बॅरिकेड्स असते, तर आज माझा मुलगा जिवंत असता, अशा शब्दांत त्याच्या वडिलांनी आपला आक्रोश व्यक्त केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.