नवी दिल्ली : डाव्या चळवळीतील दिग्गज नेते सीताराम येचुरी यांचं गुरुवारी निधन झालं. सिताराम येचुरी यांनी वयाच्या ७२ व्या वर्षी दिल्लीतील एम्स रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. त्यांना १९ ऑगस्ट रोजी एम्स रुग्णालयात दाखल केलं होतं. मागील काही दिवसांत त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. मात्र, आज त्यांना श्वास घेताना अडचणी येत होत्या. त्यांना न्यूमोनिया झाला होता. एम्समधील विशेष डॉक्टरांचं पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होतं. मात्र, त्यांची न्यूमोनियाशी झुंज अपयशी ठरली.
सीताराम येचुरी यांच्या पश्चात त्यांच्या मागे पत्नी सीमा चिश्ती येचुरी आणि मुलगी अखिला येचुरी असा परिवार आहे. त्यांच्या मुलगा आशीष यांचं २०२१ मध्ये निधन झालं. सीताराम येचुरी यांनी विद्यार्थी दशेतच राजकारणाला सुरुवात केली. ते जेएनयूमधील विद्यार्थी संघटनेत होते. काही काळ त्यांना तुरुंगवास देखील भोगावा लागला होता. त्यांनी किमान ५ दशकं डाव्या चळवळीचं नेतृत्व केलं आहे.
डाव्या चळवळीतील राजकीय पक्षांच्या युतीचं श्रेय सीताराम येचुरी यांना जातं. युपीए वन आणि युपीए टू सरकार स्थापनेच्या दरम्यान डाव्या चळवळीतील राजकीय पक्षांना सरकारमध्ये सामील होण्यास विनंती करण्याचं काम येचुरी यांनी केलं होतं.
२०१५ साली मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाचे महासचिव म्हणून त्यांनी भूमिका निभावली होती. या व्यतिरिक्त त्यांना २०१६ साली राज्यसभेत सर्वश्रेष्ठ खासदार पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. धर्मनिरपेक्ष, आर्थिक समानता सारख्या मुल्यांना सीताराम येचुरी यांनी वैयक्तिक आयुष्यात महत्वाचं स्थान दिलं होतं.
सीताराम येचुरी यांचा जन्म १२ ऑगस्ट १९५२ रोजी मद्रासमध्ये झाला. त्यांचे वडील आंध्रप्रदेश रोडवेजमध्ये इंजीनिअर म्हणून कार्यरत होते. तर त्यांच्या आई देखील सरकारी अधिकारी होत्या. सीताराम येचुरी यांचं दहावीपर्यंत शिक्षण हैदराबादच्या ऑल सेंट्स हायस्कूलमध्ये झालं.
हैदराबादमध्ये शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी दिल्लीकडे मोर्चा वळवला. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून अर्थशास्त्रात बीए ऑनर्सची डिग्री मिळवली. त्यानंतर जेएनयूमध्ये अर्थशास्त्रात एमएची डिग्री मिळवली. त्यांना अर्थशास्त्रात पीएचडी करायची होती. मात्र, आणीबाणीच्या काळात आंदोलनात सहभागी झालेल्या येचुरी यांना अटक झाली होती. त्यांना तुरुंगात देखील जावं लागलं होतं. त्यानंतर ते शिक्षणापासून दूर गेले. पुढे ते पूर्णवेळ राजकारणात सक्रीय झाले. सीताराम येचुरी यांचे काँग्रेस. आरजेडीसहीत इतर राजकीय पक्षांशी चांगले संबंध होते. समान विचासरणीच्या राजकीय पक्षांच्या संपर्कात राहण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असायचा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.