वाराणसी शिक्षक मतदारसंघात समाजवादी पक्षाचे लाल बिहारी यादव विजयी
भाजपचे उमेदवार डॉ. प्रमोद कुमार मिश्रा यांना ६,०६० मते मिळाली
वाराणसी मतदारसंघात भाजपचा पराभव
लाल बिहारी यादव यांनी ४,८९८ मतांच्या फरकाने विजय मिळवला.
उत्तर प्रदेशातील विधान परिषद निवडणुकीत वाराणसी मतदारसंघात समाजवादी पक्षाने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. शिक्षक मतदारसंघातून सपाचे उमेदवार लाल बिहारी यादव यांनी भाजपचे उमेदवार डॉ. प्रमोद कुमार मिश्रा यांचा पराभव केला. दुसरीकडे, पदवीधर मतदारसंघातील मतमोजणीतही समाजवादी पक्षाचा उमेदवार आघाडीवर होता. त्यामुळे वाराणसीतील दोन्ही जागांवर भाजपसमोर आव्हान उभे राहिले आहे.
वाराणसीमध्ये शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत लाल बिहारी यादव यांना एकूण १० हजार ९५८ मते मिळाली, तर भाजपचे डॉ. प्रमोद कुमार मिश्रा यांना ६ हजार ६० मते मिळाली. यादव पहिल्या फेरीत आघाडीवर होते. मात्र, विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा पूर्ण न झाल्याने दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी करावी लागली. निवडणुकीतील अन्य उमेदवारांमध्ये चेतनारायण सिंह यांना ३ हजार १११, डॉ. जितेंद्र कुमार सिंह यांना १ हजार ८८, सुधांशू शेखर त्रिपाठी यांना ५३३ आणि ऋतिका दुबे यांना ४५० मते मिळाली. याशिवाय संजय राय प्रियदर्शी यांना ३१०, धर्मेंद्र कुमार यादव यांना १८२, डॉ. फरीद अन्सारी यांना १५२ आणि अवधेश सिंह यांना १०८ मते मिळाली. एकूण १ हजार ४४१ मतपत्रिका अवैध ठरवण्यात आल्या.
वाराणसी विभागीय मतदारसंघात आठ जिल्ह्यांचा समावेश आहे. वाराणसी, चंदौली, जौनपूर, गाझीपूर, मिर्झापूर, सोनभद्र, भदोही आणि बलिया या जिल्ह्यांत मतदान पार पडले. या निवडणुकीत पदवीधर मतदारसंघासाठी २४, तर शिक्षक मतदारसंघासाठी १० उमेदवार रिंगणात होते. २३ ऑक्टोबर रोजी झालेल्या मतदानात शिक्षक मतदारसंघात ६९.८७ टक्के, तर पदवीधर मतदारसंघात ४१.११ टक्के मतदानाची नोंद झाली.
शिक्षक मतदारसंघातील ३४ हजार ९०० मतदारांपैकी २४ हजार ३८४ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. पदवीधर मतदारसंघात २.८८ लाख मतदारांपैकी १ लाख १८ हजार ६११ मतदारांनी मतदान केले. यापूर्वीच्या निवडणुकीतही समाजवादी पक्षाने या दोन्ही जागा जिंकल्या होत्या. यंदाही सपाने भाजपवर मात करत आपला विजय कायम ठेवला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.