

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या बैठकांवर बैठका सुरू आहेत. आपल्या पक्षाला जास्तीत जास्त जागा मिळव्यात यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे प्रयत्न सुरू आहेत. भाजप आपल्या सर्व मित्र पक्षांना जवळपास ५५ ते ६० जागा देण्याची शक्यता आहे. भाजप ३४० ते ३५० विधानसभा जागांवर स्वचिन्हावर निवडणूक लढवू शकते. या निवडणुकीमध्ये मित्रपक्षांनी भाजपकडे जास्त जागांची मागणी केली आहे. त्यामुळे भाजप कोणत्या पक्षाला किती जागा देणार हे पाहणं महत्वाचे राहिल.
उत्तर प्रदेशमध्ये भाजपने सध्या अपना दल, आरएलडी, निषाद पार्टी आणि सुभासपा या ४ पक्षांसोबत युती केली आहे. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने उत्तर प्रदेशमधील ३७६ विधानसभा जागांवर निवडणूक लढवली होती. त्यावेळी भाजपची युती फक्त अपना दल आणि निषाद पार्टी यांच्यासोबत होती. पण आता २०२७ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या मित्रपक्षांची संख्या २ ने वाढली आहे. या निवडणुकीत भाजपसोबत चार मित्रपक्ष आहेत. जागा वाटपाबाबत या सर्व पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे.
उत्तर प्रदेशातील काही जागांवर भाजपचे मित्रपक्ष अडून आहेत. ती जागा त्यांच्याच पक्षाला मिळावी यासाठी ते आग्रही आहेत. निशाद पार्टीने अत्रौलिया जागेवर दावा केला आहे. निषाद पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री संजय निषाद यांनी सांगितले की, 'आम्ही एनडीएचे भागीदार आहोत. सर्व ४०३ विधानसभा जागांवर विजय मिळवणे ही आमची जबाबदारी असणार आहे. आम्ही अत्रौलिया कधीच सोडली नाही. ही निषाद पक्षाची जागा आहे. निषाद तेव्हाही होते, आजही आहेत आणि उद्याही असतील. इथले लोक विसरलेले नाहीत. काही लोकांचा गैरसमज आहे. त्यांना सर्व जागा सोडून फक्त ही एक जागा लढवायची आहे.'
दरम्यान, २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ३७६ जागांवर उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आणि २५५ जागा जिंकल्या होत्या. आरएलडीने ३३ जागांवर उमेदवार दिले होते आणि ८ जागा जिंकल्या होत्या. अपना दलने १७ जागांवर उमेदवारांना संधी दिली होती आणि १२ जागांवर विजय मिळवला होता. निशाद पक्षाने १० जागांवर उमेदवार उभे केले होते आणि त्यापैकी ६ जागांवर विजय मिळवण्यात त्यांना यश आले होते. सुभासपाने १९ जागांवर उमेदवार उभे केले होते आणि या पक्षाने ६ जागा जिंकल्या होत्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.