

५२ प्रमुख मंदिरांमध्ये १ सप्टेंबर २०२६ पासून मोबाईल फोनवर निर्बंध लागू
मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी भाविकांना मोबाईल निर्धारित काउंटरवर जमा करावा लागतो.
फोन जमा करण्यासाठी प्रति मोबाईल ५ रुपये शुल्क आकारले जाणार
तामिळनाडूमध्ये मंदिरात जाणाऱ्या भाविकांसाठी एक नियम लागू करण्यात आलाय. राज्याच्या 'हिंदू धार्मिक आणि धर्मादाय बंदोबस्त विभागाने' राज्यातील प्रमुख मंदिरांच्या आवारात मोबाईल फोन नेण्यावर बंदी घातली आहे. मद्रास उच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या निर्देशांनुसार हा निर्णय राज्यात लागू करण्यात आलाय. मंदिराच्या आवारात भाविकांकडून फोटो काढणे, व्हिडिओ रेकॉर्ड करणे आणि सोशल मीडियासाठी 'रील्स' (reels) बनवणे यांसारख्या गोष्टी केल्या जात असल्यानं मंदिरांमध्ये मोबाईल फोनच्या वापरावर बंदी घालण्यात आलीय.
तमिळनाडूतील प्रमुख मंदिरांमध्ये भाविकांना आता मोबाईल फोन नेण्याची परवानगी दिली जाणार नाही. मोबाईल फोन जमा करण्यासाठी मंदिरांच्या प्रवेशद्वारांवर स्वतंत्र काऊंटर्स उभारण्यात आली आहेत. या सेवेसाठी प्रति फोन ५ रुपये इतके निश्चित शुल्क आकारले जाईल. भाविकांनी आपले फोन जमा केल्यानंतर त्यांना पावती किंवा टोकन दिले जाईल. देवदर्शन झाल्यानंतर ही पावती दाखवून ते आपले फोन परत घेऊ शकतात.
HR&CE (हिंदू धार्मिक आणि धर्मादाय विभाग) च्या म्हणण्यानुसार, अनेक भाविक अजूनही मंदिरांच्या आत मोबाईल फोनचा वापर करत होते. विशेषतः तरुण मंडळींनी मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडिओ रेकॉर्ड करणे, सेल्फी घेणे आणि सोशल मीडियासाठी छोटे व्हिडिओ व 'रील्स' (reels) बनवणे सुरू केले होतं. अशा कृतींमुळे मंदिरातील शांत आणि आध्यात्मिक वातावरणात व्यत्यय येतो तसेच इतर भाविकांची गैरसोय होते. याच कारणामुळे, मंदिरांच्या आत मोबाईल फोनच्या वापरावर कडक बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
हा निर्णय अचानक घेण्यात आलेला नाही. हा निर्णय लागू करण्यासाठी मद्रास उच्च न्यायालयाने आधी दिलेल्या एका आदेशाचा आधार घेण्यात आलाय. मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने २ डिसेंबर २०२२ रोजी दिलेल्या आदेशानुसार हा निमय लागू करण्यात आलाय. तिरुचेंदूर येथील 'अरुलमिगु सुब्रमण्य स्वामी' मंदिरात मोबाईल फोनच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवरील (PIL) सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने हा आदेश दिला होता.
ही याचिका सीतारामन नावाच्या व्यक्तीने दाखल केली होती. या निर्णयानुसार, भाविकांना मंदिरांमध्ये मोबाईल फोन नेण्यापासून थांबवावं. त्यांच्या फोनच्या सुरक्षितपणे ठेवण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश देणारी विभागीय परिपत्रकेही जारी करण्यात आली होती.
तमिळनाडूचे एचआर अँड सीई मंत्री रमेश यांनी विधानसभेत आधीच घोषणा करण्यात आली होती. राज्यातील प्रमुख मंदिरांमध्ये मोबाईल फोन नेण्यावर बंदी करण्याचा निर्णय १ सप्टेंबरपासून लागू केला गेला. मंदिराच्या प्रवेशद्वारावर आणि परिसराबाहेर स्पष्टपणे दिसणारे फलक लावण्याचे निर्देश मंदिर प्रशासनाला देण्यात आले आहेत. या फलकांवर मंदिरात मोबाईल फोन नेण्यास मनाई असल्याचे नमूद केले जाईल. यासह ध्वनिवर्धकांद्वारे (लाउडस्पीकर्स) भाविकांना या नियमाबाबत सूचित केले जाईल.
या नियमाचा उद्देश केवळ फोटो काढण्याची मनाई करणे हा नाहीये. विभागाच्या निर्देशानुसार, भाविकांना मंदिर परिसरात मोबाईल फोन नेण्यासही मनाई असेल. फोटो काढणे, व्हिडिओ रेकॉर्ड करणे, सेल्फी घेणे आणि सोशल मीडियासाठी 'रील्स' (reels) तयार करणे यांसारख्या गोष्टींना प्रतिबंध यातून करण्यात आलाय. सरकार आणि मंदिर प्रशासनाचा असा युक्तिवाद आहे की, यामुळे मंदिरांमधील शांततापूर्ण आणि धार्मिक वातावरण टिकून राहील तसेच इतर भाविकांची गैरसोय होणार नाही याचीही खात्री केली जाणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.