

सरन्यायाधीश सूर्यकांत बेरोजगार तरुणांबाबत मोठं विधान
सुप्रीम कोर्टातील सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश संतापले
दिल्ली वकिलांच्या पदव्यांची चौकशी करू असे ते म्हणाले
न्यायव्यवस्थेवरील सोशल मीडिया पोस्टवरून ते संतापले
भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत शुक्रवारी एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान चांगलेच संतापले. देशातील बेरोजगार तरुणांना त्यांनी झुरळांची उपमा दिली. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सांगितले की, 'काही बेरोजगार तरुण झुरळांसारखे असतात. जे नंतर माध्यम, सोशल मीडिया किंवा आरटीआय कार्यकर्ते बनून व्यवस्थेवर हल्ला करतात.'
सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी एका वकिलाने ज्येष्ठ वकील दर्जा मिळवण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. 'समाजात आधीच असे परजीवी आहेत जे व्यवस्थेवर हल्ला करतात.', असे म्हणत खंडपीठाने त्या वकिलाला फटकारले. या खंडपीठाने सांगितले की, 'जगात प्रत्येकजण वरिष्ठ वकील होण्यास पात्र असेल, पण तुम्ही त्यासाठी पात्र नाही. जरी दिल्ली हायकोर्टाने तुम्हाला वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त केले. तरी सुप्रीम कोर्टाच्या तुमच्या वर्तणुकीच्या आधारावर तो निर्णय रद्द करेल.'
दिल्ली हायकोर्टात वरिष्ठ वकील पदनामाशी संबंधित एका याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीशांनी सांगितले की, 'समाजात आधीच काही परजीवी आहेत जे या व्यवस्थेवर हल्ला करतात आणि तुम्हालाही त्यांच्याशी हातमिळवणी करायची आहे का?' सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या काही तरुणांचा उल्लेख करत त्यांनी तीव्र शब्दांत टीका केली, 'काही तरुण झुरळांसारखे असतात. त्यांना ना रोजगार मिळतो. ना व्यवसायात स्थान. ते मीडिया, सोशल मीडिया, आरटीआय कार्यकर्ते किंवा इतर कार्यकर्ते असल्याचे भासवून सर्वांवर टीका करायला सुरुवात करतात.'
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी स्पष्ट केले की, फेसबुक आणि यूट्यूबसह सोशल मीडियावर न्यायव्यवस्थेविरोधात होणाऱ्या कारवायांवर कोर्ट लक्ष ठेवून आहे. त्यांनी विचारले, 'ते जे काही पोस्ट करत आहेत त्यावर आम्ही लक्ष ठेवत नाही असे त्यांना वाटते का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी दिल्लीतील काही वकिलांच्या एलएल.बी. पदव्यांच्या सत्यतेबद्दलही शंका उपस्थित केली. त्यांनी असेही सांगितले की, ' अशा एका प्रकरणाची वाट पाहत आहे ज्याच्या आधारावर मी दिल्लीतील अनेक वकिलांच्या पदव्यांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश देऊ शकेन. मला त्यांच्या पदव्यांच्या सत्यतेबद्दल गंभीर शंका आहेत.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.