

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टानं बुधवारी मोठा दिलासा दिला. राहुल यांच्यांविरोधातील कथित बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात महत्वाचा आदेश दिला आहे. केंद्रीय तपास यंत्रणा अर्थात सीबीआय आणि ईडीला तक्रारीत केलेल्या आरोपांमधील सत्यता पडताळण्याचे आणि या तपासाची माहिती देण्याचे अलाहाबाद हायकोर्टाने दिलेले आदेश रद्द करण्यात आले आहेत.
सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने नव्याने विचार करण्यासाठी हे प्रकरण अलाहाबाद हायकोर्टाकडे पुन्हा पाठवले आहे. या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींनाही पक्षकार करण्याचे आदेश दिलेले आहेत. राहुल गांधींच्या वतीने कोर्टात ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली.
कर्नाटकातील भाजप कार्यकर्ता एस. विघ्नेश शिशिर यांच्या वतीने अलाहाबाद हायकोर्टात या एक याचिका दाखल करण्यात आली होती. राहुल गांधी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर उत्पन्नापेक्षा अधिक संपत्तीचा आरोप या याचिकेद्वारे केला होता. सीबीआय आणि ईडीद्वारे या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही याचिकाकर्त्यानं केली होती. या तक्रारीच्या संदर्भात आणि आरोपांबाबत काही कागदपत्रेही त्यांनी कोर्टात सादर केली होती.
अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनऊ खंडपीठाने मे २०२६ रोजी याचिकेवर सुनावणी घेतली. सीबीआय आणि ईडीद्वारे आरोपांची सत्यता कायद्यानुसार पडताळून बघावी आणि या प्रकरणाच्या तपासातील माहिती कोर्टाला देण्यात यावी, असे आदेश देण्यात आले होते.
हायकोर्टाच्या आदेशाला राहुल गांधी (Rahul Gandhi in supreme court) यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. सीबीआय आणि ईडीला तक्रारीची सत्यता पडताळून बघण्याचे आणि तपासात झालेल्या प्रगतीची माहिती देण्याचे निर्देश दिले होते, त्याविरोधात राहुल यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. गांधींच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी कोर्टात बाजू मांडली होती. या प्रकारची प्रक्रिया कायद्याला धरून नाही असं सांगतानाच, याचिका दाखल करण्याची पात्रता आणि त्यांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आता या प्रकरणात आज, बुधवारी सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचे आदेश रद्द केले असून, राहुल गांधींना हा मोठा दिलासा असल्याचे मानले जात आहे.
सुप्रीम कोर्टाने बुधवारी दिलेल्या आदेशानंतर हे प्रकरण पुन्हा अलाहाबाद हायकोर्टात जाणार आहे. यासंदर्भातील याचिकेवर नव्याने विचार केला जाईल. राहुल गांधींना पक्षकार केल्यानंतर त्यांनाही या प्रकरणात आपली बाजू मांडण्याची संधी मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.