

राहुल गांधींवर निष्ठावान कार्यकर्त्यांचा विश्वासघात केल्याचा गंभीर आरोप
शो कॉज नोटीस न देता निलंबन आणि सहा वर्षांसाठी निष्कासन करण्यात आल्याचा दावा
राहुल गांधी यांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आलीय.
काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. मोदी सरकारला कोंडीत पकडणारे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर महिला नेत्याने गंभीर आरोप केले आहेत. कोणतीही औपचारिक कारणे दाखवा नोटीस न देता प्रथम निलंबित आणि त्यानंतर पक्षातून सहा वर्षांसाठी निष्कासित करण्यात आल्यानंतर गोवा काँग्रेसच्या नेत्या शर्मिला सिद्दीकी यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्य काँग्रेसमधील वाढता अंतर्गत गोंधळ, वैचारिक तडजोड आणि गैरव्यवस्थापनावर गंभीर आरोप केलेत.
केंद्रीय नेतृत्वाला थेट आवाहन करत सिद्दीकी यांनी राहुल गांधी यांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली. राज्यातील नेतृत्व वास्तवापासून पूर्णपणे दूर गेले असून, पक्षाला अत्यंत कठीण काळात उभे ठेवणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांनाच आज डावलले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
सिद्दीकी यांनी AICC चे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्यासोबत घडलेल्या एका अपमानास्पद प्रसंगाचा उल्लेख केला. स्थानिक नेत्यांना अचानक पदावरून हटविण्याच्या निर्णयाबाबत चर्चा करण्यासाठी त्या प्रतिनिधीमंडळासह गेल्या असता, वेणुगोपाल यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास नकार देत त्यांना “बाहेर जा” असे सांगितल्याचा आरोप त्यांनी केला. त्या म्हणाल्या, “राहुल गांधी आम्हाला प्रश्न विचारण्यास आणि सत्यासाठी लढण्यास सांगतात. मग मी पंतप्रधानांना प्रश्न विचारू शकते, पण काँग्रेस अध्यक्षांच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित केल्यामुळे मला पक्षातून काढून टाकले जाते आणि अपमानित केले जाते, हे कसे योग्य आहे?”
गेल्या पाच वर्षांत पक्षासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या कार्यकर्त्यांचा उल्लेख करत सिद्दीकी यांनी स्वतःसह मनीषा उसगावकर आणि अमित पाटकर यांसारख्या नेत्यांनी पक्षाला पुन्हा उभे करण्यासाठी सातत्याने काम केल्याचे सांगितले. सोशल मीडियावरील टीका आणि सार्वजनिक विरोध सहन करत पक्षाला “शून्यातून” उभे केले, मात्र आता बाहेरून आलेल्या व्यक्तींना पक्षाची धुरा दिली जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
स्थानिक ब्लॉक समित्यांना डावलून बाहेरून आलेल्या व्यक्तींना उमेदवारी देण्याच्या पद्धतीमुळे भविष्यात आणखी पक्षांतरे होतील, असा इशारा सिद्दीकी यांनी दिला. विशेषतः सांताक्रूझ मतदारसंघातील अलीकडील उमेदवारी घोषणेचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, निष्ठावान कार्यकर्त्यांऐवजी व्यवहाराच्या आधारावर होणाऱ्या प्रवेशामुळेच काँग्रेसचे १८ आमदार पाचांवर आले आणि अनेक नेत्यांनी सहजपणे भाजपमध्ये प्रवेश केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.