दिल्लीतील द्वारका येथे संरक्षण मंत्रालयात सहाय्यक सेक्शन ऑफिसर म्हणून कार्यरत असलेल्या तीन महिन्यांच्या गरोदर महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मृत महिलेची ओळख नझिया खान (वय 30) अशी झाली आहे. ही घटना 21 ऑगस्ट रोजी घडली असून नाझियाच्या कुटुंबीयांनी तिचा पती आणि सासरच्या लोकांवर मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
नाझियाचा विवाह 11 एप्रिल 2026 रोजी अजं अली खान याच्यासोबत झाला होता. नाझियाचे वडील तौवाब खान यांनी दाखल केलेल्या FIR नुसार, नाझियाचा पती अजम आणि सासू सासऱ्यांकडून तिचा वारंवार छळ केला जात होता. तिला शिवीगाळ आणि मारहाण केली जात होती. तसेच घराबाहेर काढण्याच्या आणि जीवे मारून टाकण्याच्या धमक्याही दिल्या जात असल्याचा आरोप आहे. वडिलांच्या म्हणण्यांनुसार नाझिया फोनवरून नेहमी माहेरच्यांना आपल्याला होत असलेल्या त्रासाबाबत माहिती देत होती. ती तीन महिन्यांची गरोदर असताना नवऱ्याच्या वागण्यात कोणताही बदल झाला नाही, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान नवऱ्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी दोघांमध्ये वाद झाला होता. नाझियाने त्याला एका खोलीत बंद केले आणि स्वतः दुसऱ्या खोलीत गेला असल्याचे तो म्हणाला. त्यानंतर त्याने घरमालकाला बोलावले. घरमालकाच्या मदतीने शिडीच्या सहाय्याने तो बाल्कनीतून बाहेर आला. त्यानंतर खिडकीतून पाहिले असता नाझिया छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्याचे पतीने पोलिसांना सांगितले.
नाझियाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिसांनी नाझियाच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती दिल्यानंतर तिचे वडील तौवाब खान आणि भावाने बिजवासनचे कार्यकारी दंडाधिकारी दिनेश राणा यांच्यासमोर जबाब नोंदवला. नाझियाच्या कुटुंबीयांनी तिच्या मृत्यूला पती आणि सासरच्या मंडळींना जबाबदार धरत कठोर कारवाईची मागणी केली आहे. कुटुंबीयांचा आरोप आहे की नाझियाची हत्या करण्यात आली, तर FIRमध्ये पतीने तिला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिल्याचा दावा केला आहे.
पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 85 आणि कलम 108 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.