

Narendra Modi Cabinet News : नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल होण्याचे संकेत मिळाले आहे. १८ जून रोजी राज्यसभा निवडणुका पार पडणार आहे, त्यानंतर मंत्रिमंडळात फेरबदल होऊ शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. न्यू इंडियन एक्सप्रेसने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोणत्या मंत्रालयांमध्ये बदल होणार, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. पण जवळपास १२ मंत्र्यांपर्यंत हा आकडा जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
रिपोर्ट्सनुसार, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये पुढील २ वर्षात विधानसभा निवडणुका होणार आहे. भाजपकडून त्याची तयारी करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ बदलाचा निर्णय घेतला जाऊ शकतो. सूत्रांचा हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटलेय की, दोन कॅबिनेट मंत्री आणि तीन राज्यमंत्र्यांना मंत्रिमंडळातून हटवले जाऊ शकते. दक्षिणेकडील राज्यात पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी एका ज्येष्ठ मंत्र्याची नियुक्ती केली जाऊ शकते, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.
अहवालानुसार, जेडी(यू), टीडीपी, एनसीपी आणि आरएलएमसारख्या मित्रपक्षांना मोदी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. नितीश कुमार यांच्या जेडी(यू) आणि चंद्रबाबू नायडू यांच्या टीडीपीला याचा सर्वाधिक फायदा होण्याची शक्यता आहे. आघाडीतील बहुतेक नेत्यांना राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.
राज्यसभेतील आपला कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या अनेक मंत्र्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. त्यांच्याकडे पक्ष संघटनेची जबाबदारी दिली जाऊ शकते. अहवालानुसार, ७० वर्षांवरील काही राज्यसभा खासदारांच्या बदलीचा विचार केला जाऊ शकतो. नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते, असे मानले जात आहे. भाजपच्या आघाडीच्या नेत्यांना पहिल्यांदाच मंत्रिमंडळात स्थान दिले जाऊ शकते.
या मंत्रालयांमध्ये बदल होण्याची शक्यता
रिपोर्ट्सनुसार, रेल्वे, वित्त, कॉर्पोरेट व्यवहार, कोळसा, वस्त्रोद्योग, माहिती आणि प्रसारण, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी, ग्रामीण विकास, रसायने आणि खते, सहकारी संस्था, मत्स्यव्यवसाय, जलविद्युत, कृषी आणि पर्यावरण, कायदा आणि इतर विभागांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. पण यावर कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
राज्यसभा निवडणुका
१८ जून रोजी राज्यसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक येथील प्रत्येकी चार जागा, मध्य प्रदेश आणि राजस्थान येथील प्रत्येकी तीन जागा, झारखंड येथील दोन जागा आणि मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश व मिझोराम येथील प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे. महाराष्ट्र आणि तामिळनाडू येथील प्रत्येकी एका राज्यसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूकही होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.