नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडीने लोकसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत पुन्हा एकदा ओम बिर्ला यांना मैदानात उतरवलं आहे. तर विरोधी पक्षांनी के सुरेश यांना उमेदवारी दिली आहे. लोकसभा अध्यक्षपदासाठी २६ जूनसाठी निवडणूक होणार आहे. ही निवडणूक तब्बल १९५२ सालानंतर पहिल्यांदा होणार आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलं की, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना फोन केला. राजनाथ सिंह यांनी काँग्रेसच्या पाठिंब्यासाठी त्यांना कॉल केल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच राजनाथ सिंह यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना रिटर्न कॉल करणार असल्याचेही बोललं होतं. मात्र, त्यांनी पुन्हा कॉल केला नाही. सत्ताधाऱ्यांकडून आमच्या नेत्याचा अपमान केला जातोय. या सरकारचा हेतू चांगला नाही, असेही राहुल गांधींनी पुढे सांगितले.
संविधानाच्या कलम ९३ मध्ये लोकसभा अध्यक्षाविषयी माहिती उपलब्ध आहे. नव्या खासदारांसाठी शपथ देण्यासाठी राष्ट्रपतीकडून हंगामी लोकसभा अध्यक्षांची निवड केली जाते. लोकसभा अध्यक्षांची निवड बहुमताच्या आधारावर केली जाते. संसदेत खासदारांच्या मतदानाच्या आधारावर लोकसभा अध्यक्षांची निवड केली जाते.
दरम्यान, १५ मे १९५२ साली पहिल्यांदा लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली होती. या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचे जीवी मावळणकर हे उमेदवार होते. तर त्यांच्या विरोधात शंकर शांताराम मोरे उमेदवार होते. मावळणकर यांना ३९४ मते मिळाली होती. तर शांताराम मोरे यांना ५५ मते मिळाली होती. या निवडणुकीनंतर मावळणकर हे देशाचे पहिले लोकसभा अध्यक्ष ठरले होते.
इंडिया आघाडी विरुद्ध राष्ट्रीय लोकशाही आघाडी
लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भाजपच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ओम बिर्ला यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. ओम बिर्ला यांच्याकडून लोकसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करत असताना अमित शहा, जेपी नड्डा सहित भाजपचे दिग्गज नेते उपस्थित होते. तसेच चिराग पासवान, जीतनराम मांझी, अनुप्रिया पटेलसहित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित होते.
दुसरीकडे विरोधकांकडून के सुरेश यांनी उमेदवारीचा अर्ज भरला. लोकसभा अध्यक्षपदाच्या उमेदवारीचा अर्ज भरताना काँग्रेस नेत्यांसहित डी राजा देखील उपस्थित होते.