
Israel-Iran war escalation : इस्रायल-इराण युद्ध पेटलं आहे. इस्रायलनं इराणवर जोरदार हल्ला चढवला आहे. या हल्ल्यात इराणच्या लष्कराचा प्रमुख मोहम्मद बाघेरी आणि क्षेपणास्त्र उपक्रमाचं नेतृत्व करणाऱ्या जनरल आमिर अली हाजिजादेह हे देखील मारले गेले आहेत. याशिवाय लष्कराचे इतर वरिष्ठ कमांडरही ठार झाले आहेत. इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अनेक आण्विक ठिकाणांचीही अतोनात हानी झाली आहे. इस्रायलच्या या हल्ल्याला तितक्याच ताकदीने इराण प्रत्युत्तर देण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यक्त केली जात आहे. त्यामुळं इस्रायल हायअलर्टवर आहे. त्यादृष्टीनं तातडीनं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. जगभरातील आपले दूतावास बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. इस्रायलच्या स्वीडनमधील दूतावासाकडून ही माहिती देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या सैन्यदलाचे २० टॉप कमांडर मारले गेले आहेत. त्यानंतर इराणकडूनही हल्ला होण्याची भीती त्यांना आहे. त्यामुळे आधीपासूनच ते अलर्ट झाले आहेत. इराणकडून हल्ल्याला प्रत्युत्तर दिला जाऊ शकतो. त्यामुळं त्याला उत्तर देतानाच कमीत कमी नुकसान होईल यादृष्टीनं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. स्वीडनमधील दूतावासाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्याचा घटनाक्रम बघता जगभरातील विविध देशांत असलेले इस्रायलचे दूतावास बंद करण्यात येतील. पुढील सूचना किंवा आदेश मिळेपर्यंत ते बंद राहतील. त्याठिकाणी कोणत्याही प्रकारची काउन्स्युलर सर्व्हिसेस दिली जाऊ शकणार नाही, असे दूतावासाचे म्हणणे आहे.
सध्याची परिस्थिती बघता इस्त्रायलनं उचललेलं पाऊल हे येत्या काळात महायुद्ध पेटण्याचे संकेत आहेत. दुसरीकडे इस्रायलच्या हल्ल्यात मिसाइल प्रोग्रामचे प्रमुख आमिर अली हाजिजादेह मारले गेल्याच्या वृत्ताला इराणकडून दुजोरा मिळालेला आहे. त्यामुळं इराणही आक्रमक झाला असून इस्रायलला स्पष्ट शब्दांत धमकी दिली आहे. याचा शेवट आम्हीच करणार, असा इशाराच इराणकडून देण्यात आला आहे. त्यानंतर इस्रायलनं अलर्ट जारी केला आहे. इराण आणि इस्रायलनं देखील आपापले हवाईतळ बंद केले आहेत. शेजारील इराक, सीरिया, जॉर्डन, लेबनॉनसारख्या देशांनीही त्यांच्या हवाई सीमा बंद केल्याचे वृत्त आहे.
इराणकडून होणाऱ्या संभाव्य हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इस्रायलनं नॅचरल गॅस सेंटरही अस्थायी स्वरुपात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. इस्रायलच्या ऊर्जामंत्र्यांनीही त्याला दुजोरा दिला आहे. इराणकडून हल्ला होण्याची शक्यता असून, सर्वात मोठ्या नॅचरल गॅस सेंटरला लक्ष्य केलं जाऊ शकतं, असं इस्रायलला वाटतं. त्यामुळं पुढील सूचनावजा आदेश मिळेपर्यंत गॅसचं उत्पादनही थांबवण्यात आलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.