गिनीची राजधानी कोनाक्रीमध्ये मुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना
कचऱ्याचा मोठा ढिगारा कोसळून किमान ३० जणांचा मृत्यू
सहा जण गंभीर जखमी झाले असून बचाव पथकांकडून शोधमोहीम सुरू
कचऱ्याचा ढिगारा खाली असलेल्या घरांवर कोसळल्याने नागरिकांना मोठा फटका
पश्चिम आफ्रिकेतील गिनीची राजधानी कोनाक्रीमध्ये मुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. बेसिया जिल्ह्यातील दार-ए-सलाम परिसरात असलेल्या एका मोठा कचऱ्याचा ढिगारा अचानक कोसळला. या कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली दबून किमान ३० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दुर्घटनेत सहा जण गंभीर जखमी झाले असून त्यांना बचाव पथकाने ढिगाऱ्यातून बाहेर काढले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना रविवारी पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास घडली. गेल्या काही दिवसापासून कोनाक्रीमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. या जोरदार पावसामुळे कचऱ्याचा मोठा भाग खचला आणि खाली असलेल्या घरांवर कोसळला. या परिसरात अनेक कच्ची घरे असल्याने त्यातील नागरिकांना मोठा फटका बसला. अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
स्थानिक प्रशासनाच्या माहितीनुसार, बचाव पथकांनी घटनस्थळी धाव घेत मलबा हटवून त्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. दार-ए-सलाम परिसराचे प्रमुख लॅन्सिन सिला यांनी सांगितले की, आतापर्यंत अनेक मृतदेह बाहेर काढण्यात आले असून ते शवागारात पाठवण्यात आले आहेत. मात्र, अजूनही काही नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता आहे. गिनीच्या प्रादेशिक प्रशासन मंत्री जेनाबू टुरे यांनी घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याचा आढावा घेतला. आपत्कालीन पथके मलब्यात शोधमोहीम राबवत आहेत. बचावकार्य पूर्ण झाल्यानंतरच मृत आणि जखमींची अंतिम संख्या जाहीर केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
विशेष म्हणजे, हा डम्पिंग ग्राउंड आधीपासूनच धोकादायक होता. डम्पिंग ग्राउंडजवळ राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेबाबत प्रशासनाने यापूर्वी चिंता व्यक्त केली होती. नागरिकांना परिसर रिकामा करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. डम्पिंग ग्राउंडचा काही भाग कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन सुरक्षेच्या उपाययोजनाही करण्यात आल्या होत्या. दरम्यान, हा डम्पिंग ग्राउंड रविवारीच बंद करण्यात येणार होता. मात्र, त्याआधीच कचऱ्याचा ढिगारा कोसळल्याने मोठी जीवितहानी झाली. मुसळधार पावसामुळे डम्पिंग ग्राउंडचा धोका आणखी वाढल्याचे सांगितले जात आहे. बचावकार्य सुरू असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती प्रशासनाने व्यक्त केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.