

Pew Research Center: २०३५ पर्यंत इस्लाम ख्रिश्चन धर्माला मागे टाकून जगातील सर्वात मोठा धर्म बनू शकतो अशी धक्कादायक माहिती एका संशोधनातून उघड झाली आहे. प्यू रिसर्च सेंटरने केलेल्या संशोधनाचा अहवाल बुधवारी प्रसिद्ध करण्यात आला. या अहवालानुसार, सध्या जगाची लोकसंख्या ८ अब्जांपेक्षा जास्त असून यामध्ये ख्रिस्ती धर्माच्या नागरिकांची संख्या २ अब्जांपेक्षा जास्त आहे. तर इस्लाम धर्माच्या नागरिकांची लोकसंख्याही २ अब्ज आहे. जगामध्ये सध्या इस्लाम आणि ख्रिश्चन हे दोन्ही धर्म वाढत आहेत. पण ख्रिश्चन धर्माच्या तुलनेमध्ये इस्लाम धर्म झपाट्याने वाढत आहे. यामागील एक मुख्य कारण म्हणजे इतर प्रमुख धार्मांच्या तुलनेत मुस्लिमांमध्ये मुलांची संख्या जास्त आहे.
प्यू रिसर्च सेंटरचे वरिष्ठ संशोधन विश्लेषक कॉनरॅड हॅकेट यांनी सांगितले की, जगामध्ये इस्लाम धर्म वेगाने वाढत आहे त्यामागचे प्रमुख कारण मुलांचे वाढते प्रमाण हे आहे. २०२० मध्ये जगभरात २.२७ अब्ज ख्रिश्चन आणि २.०२ अब्ज मुस्लिम होते. २०३५ पर्यंत मुस्लिमांची संख्या २.५७ अब्ज आणि ख्रिश्चनांची संख्या २.५२ अब्ज होण्याची शक्यता आहे. जर लोकसंख्या वाढ सध्याच्या दराने अशीच सुरू राहिली तर २०७० पर्यंत जगभरातील मुस्लिमांची संख्या ३.६ अब्जांपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. तर ख्रिश्चनांची संख्या ३ अब्जांपेक्षा थोडीफार कमी असेल. ख्रिश्चनांच्या तुलनेत मुस्लिमांची सख्या झपाट्याने वाढेल असा अंदाज कॉनरॅड हॅकेट यांनी वर्तवला आहे.
प्यू रिसर्च सेंटरने संशोधन अहवालातून असे देखील मत व्यक्त केले की, २०२० ते २०७० दरम्यान जगाची लोकसंख्या २९ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. यामध्ये ख्रिश्चनांच्या संख्येत ३० टक्के आणि मुस्लिमांच्या संख्येत ८० टक्के वाढ होऊ शकते. हिंदू आणि ज्यूंची एकूण संख्या वाढत असली तरी देखील जागतिक लोकसंख्येतील त्यांचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. चीन, दक्षिण कोरिया आणि जपानच्या एकूण लोकसंख्येत घट झाल्यामुळे जगभरातील बौद्धांची संख्या आणि जागतिक लोकसंख्येतील त्यांचा वाटा दोन्ही कमी होण्याचा अंदाज आहे.
२०२० ते २०७० दरम्यान भारतातील हिंदू लोकसंख्या अंदाजे १७६ कोटीने वाढण्याचा अंदाज आहे. पण जगातील लोकसंख्येतील हिंदूंचा वाटा थोडाफार कमी होऊ शकतो. प्यू रिसर्च सेटरच्या अहवालानुसार, हिंदू महिलांच्या तुलनेत मुस्लिम महिलांचा प्रजनन दर जास्त असल्यामुळे भारतात धार्मिक लोकसंख्येच्या रचनेत बदल होऊ शकतो. असे असताना देखील २०७० पर्यंत भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी तीन चतुर्थांशपेक्षा जास्त हिंदू असतील असा अंदाज प्यू रिसर्च सेंटरच्या अहवालात वर्तवण्यात आला आहे.
प्यू रिसर्च सेंटरच्या मते, गेल्या काही दशकांमध्ये भारताचा एकूण प्रजनन दर झपाट्याने घटला आहे. असे असताना देखील हिंदू महिलांच्या तुलनेत मुस्लिम महिलांना जास्त मुलं होतात. भारतातील मुस्लिम लोकसंख्या तुलनेने तरुण आहे. या दोन घटकांमुळे येत्या दशकांमध्ये देशाच्या लोकसंख्येत मुस्लिमांचे प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे. तर हिंदूंचा वाटा किंचित कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, पाकिस्तानमध्ये देखील हिंदुंची लोकसंख्या वाढण्याची शक्यता प्यू रिसर्च सेंटरच्या अहवालात वर्तवण्यात आली आहे. पाकिस्तानमध्ये हिंदुंची संख्या २०२० च्या तुलनेमध्ये दुप्पट वाढून २०७० पर्यंत १ कोटींच्या आसपास जाऊ शकतो. लोकसंख्येच्या बाबतीत पाकिस्तान जगातील इतर देशांच्या क्रमवारीत आपले चौथे स्थान कायम ठेवेल असा अंदाज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.