

मध्य प्रदेशातून एक मोठी बातमी समोर येत आहे. मध्य प्रदेशाच्या ग्वालियरमध्ये एक दुर्घटना घडली असून त्यामध्ये पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ग्वालियरमध्ये स्कॉर्पिओ आणि रिक्षाची (ऑटो) जोरदार धडक झाली. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. मुख्य म्हणजे हे पाच जण एकाच कुटुंबातील असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या पाच जणांमध्ये २ महिला आणि ३ पुरुषांचा समावेश आहे. हे कुटुंब शीतला देवीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन करून घरी परतत असताना ही दुर्घटना घडली आहे. हा अपघात इतका भीषण होता की रिक्षाचे तुकडे तुकडे झाले. हा अपघात पाहिल्यानंतर घटनास्थळावरील सर्वांना धक्का बसला होता.
या ऑटोमध्ये चालकासहित ९ जण प्रवास करत असल्याचं समोर आलं आहे, ज्यापैकी ५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर उर्वरित ४ जखमी झाले आहेत. सध्या जखमींना रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. जखमींमध्ये एक महिला, एक पुरुष आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. हा अपघात ग्वालियर जिल्ह्याच्या थाटीपूर स्टेशनच्या हद्दीत घडला आहे
ही घटना इतकी गंभीर होती की, प्रत्यक्षदर्शींनाही मोठा धक्का बसला आहे. हा अपघात घडताच आजूबाजूला असलेल्या लोकांनी आणि पोलिसांनी ऑटोमध्ये फसलेल्या जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यास मदत केली आहे, तर ज्यांचा यामध्ये मृत्यू झाला त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
दरम्यान, ऑटोला धडक देणारा स्कॉर्पिओ चालक गाडी घेऊन घटनास्थळावरून फरार झाला आहे, त्यामुळे सर्वत्र या गाडीचा शोध घेण्यात येत आहे. यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी लावली आहे. अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस यासंदर्भात अधिक तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.