
आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. किसान मजदूर मोर्चा (KMM) आणि संयुक्त किसान मोर्चा यांनी पंजाब बंदची हाक दिली आहे. पंजाब बंदनंतर रेल्वेने सोमवारी १५० ट्रेन रद्द केल्या आहेत. पंजाब आणि हरियाणामधील शंभू आणि खनौरी सीमेवर बसलेल्या एसकेएम आणि केएमएम या शेतकरी संघटनांनी गेल्या आठवड्यात पंजाब बंदचा निर्णय घेतला होता. सरकारने आपल्या मागण्या मान्य कराव्या यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. पंजाब-हरियाणा सीमेवर आंदोलन केल्यानंतर आता शेतकऱ्यांनी पंजाब बंदची हाक दिली आहे.
शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल हे किमान आधारभूत मूल्यासाठी कायदेशीर हमीसह आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी केंद्रावर दबाव आणण्यासाठी २६ नोव्हेंबरपासून खनौरी सीमेवर आमरण उपोषणासाठी बसले आहेत. त्यांच्या आमरण उपोषणाचा आज ३५ वा दिवस आहे. तरी देखील केंद्र सरकारने अद्याप काहीच निर्णय घेतला नाही त्यामुळे आता शेतकरी आक्रमक होत त्यांनी पंजाब बंदची हाक दिली.
आंदोलक शेतकरी सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅक रोखून प्रवासी आणि मालगाड्यांची वाहतूक विस्कळीत करणार आहेत. दिल्ली, अंबाला आणि फिरोजपूर विभागांना पाठवलेल्या परिपत्रकामध्ये उत्तर रेल्वेने १५० ट्रेन रद्द केल्या आहेत. ज्यामध्ये ३ वंदे भारत एक्स्प्रेसचा समावेश आहे. यामधील २ वंदे भारत एक्स्प्रेस नवी दिल्ली आणि वैष्णो देवी दरम्यान धावतात आणि एक नवी दिल्ली आणि अंब अंदौरा दरम्यान धावतात.
रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, चंदीगड आणि अजमेर दरम्यान धावणारी दुसरी वंदे भारत ट्रेन दिल्ली कँटमध्ये थांबेल किंवा बंद केली जाईल. रद्द करण्यात आलेल्या इतर ट्रेनमध्ये नवी दिल्लीहून कालका, चंदीगड आणि अमृतसरकडे धावणाऱ्या ३ शताब्दी एक्स्प्रेस आणि पंजाब, हरियाणा, चंदीगड, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये धावणाऱ्या अनेक ट्रेनचा समावेश आहे.
रेल्वेने सात ट्रेन अंशत: रुपाने रद्द करण्याचा, १४ चे विनियमित करण्याचा, १३ ट्रेन पुनर्निर्धारित करण्याचा, १५ चे अल्पकालीन प्रस्थान आणि २२ ट्रेन अल्पकालीन बंद करण्याची घोषणा देखील केली आहे. अंबाला पोलिसांनी दिल्ली आणि चंदीगड दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना NH-44 मार्गे पंचकुला, बरवाला, मुल्लाना, यमुनानगर, रादौर, लाडवा आणि पिपली येथे पर्यायी मार्गाने जाण्याचा सल्ला दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.