
बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्याच्या मोहिउद्दीननगर येथील सरकारी कार्यालयातील अजब-गजब प्रकरण समोर आलं आणि अख्खं प्रशासन हादरून गेलंय. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावानं एका व्यक्तीनं रहिवासी दाखल्यासाठी ऑनलाइन अर्ज केला आहे. हा अर्ज मिळाल्यानंतर संपूर्ण प्रशासन हादरलंय. सर्व अधिकारी-कर्मचारी वर्गानं तात्काळ दखल घेत चौकशी सुरू केली. यात मोठी गडबड असल्याचं प्रशासनाच्या लक्षात येताच अर्ज रद्द करण्यात आला आहे. आता या प्रकरणात सायबर गुन्ह्यांर्तगत एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
मोहिउद्दीननगर अंचलच्या लोकसेवा केंद्रात २९ जुलै २०२५ रोजी डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावानं ऑनलाइन अर्ज दाखल करण्यात आला होता. अर्जदाराचं नाव डोनाल्ड जॉन ट्रम्प असं नमूद करण्यात आलं होतं. अर्जावर एक फोटोही लावण्यात आला होता. अर्जात निवासस्थान म्हणून हसनपूर गाव, वार्ड क्रमांक १३, पोस्ट बाकरपूर, मोहिउद्दीननगर, जिल्हा समस्तीपूर असा पत्ता नमूद करण्यात आला होता. इतकंच नाही तर अर्जावर इमेल आयडी देखील देण्यात आला होता. हा अर्ज अंचल कार्यालयात अधिकाऱ्यांकडे आला, त्यावेळी संपूर्ण कार्यालयात खळबळ उडाली. कुणीतरी चेष्टा म्हणून हा अर्ज केला असावा, पण प्रशासनानं मात्र गंभीर दखल घेतली आहे. या प्रकाराची चौकशी करण्यात येत आहे.
बीडीओ डॉ. नवकंज कुमार आणि सीओ बृजेश कुमार द्विवेदी यांनी संयुक्तरित्या निवेदन प्रसिद्ध केलं आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली. फोटो, आधार क्रमांक, बारकोड आणि पत्ता हे सगळं बनावट होतं. अर्जात जी माहिती देण्यात आली होती, ती खोटी आहे. त्यानंतर ४ ऑगस्टला महसूल अधिकारी सृष्टी सागर यांच्याद्वारे औपचारिकरित्या हा अर्ज अवैध ठरवण्यात आला. सद्यस्थितीत निवडणूक आयोगाकडून मतदार यादी पुनर्पडताळणी कार्यक्रम सुरू आहे, त्यात अडथळा आणण्याचा हा प्रयत्न असावा, अशी शक्यता अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
प्रशासनानं हे प्रकरण गांभीर्यानं घेतलंय. अज्ञात व्यक्तीविरोधात समस्तीपूर सायबर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी संबंधित सर्व कागदपत्रे सायबर गुन्हे विभागाकडे देण्यात आली आहेत. आता हा अर्ज कोणत्या ठिकाणाहून आला आहे, कोणत्या डिव्हाइस आणि आयपीद्वारे करण्यात आला आहे याची उकल सायबर विभाग करणार आहे. बोगस अर्ज करणाऱ्याचा उद्देश नेमका काय होता, त्यानं मस्करी म्हणून हे कृत्य केलं की यामागं कोणता कट आखण्यात आला होता, याचाही तपास करण्यात येणार आहे.
या प्रकरणानंतर प्रशासन सजग झालंय. त्यांनी सर्वसामान्य जनतेला आवाहन केलं आहे. लोकसेवा केंद्रे आणि सरकारी संकेतस्थळांचा दुरुपयोग करू नका. अशा प्रकारची कृती प्रशासकीय कामकाजात अडथळा निर्माण करते. त्याचा सर्वसामान्य आणि गरजूंना फटका बसतो. सरकारी सेवा-सुविधांमध्ये पारदर्शकता ठेवण्यासाठी अधिक प्रभावीपणे उपाययोजना करण्यात येतील, असं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.