

पूर्व आफ्रिकेतील जिबूतीच्या किनाऱ्यावर प्रवाशांनी भरलेली बोट उलटल्याची घटना घडलीये. या बोटीमध्ये एकूण ३०५ प्रवासी होते. यापैकी किमान १३९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दुर्देवाची बाब म्हणजे मृतांमध्ये १५ लहान मुलांचाही समावेश आहे. तर ८४ जण अद्याप बेपत्ता आहेत. या दुर्घटनेत ८० हून अधिक प्रवाशांचे प्राण वाचवण्यात यश आलं आहे. बेपत्ता प्रवाशांचा शोध घेण्याचं काम सध्या सुरू आहे.
इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन (IOM) या आंतरराष्ट्रीय संस्थेने रविवारी याबाबत माहिती दिली. ही बोट जिबूतीहून येमेनच्या दिशेने जात होती. गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी पहाटेच्या दरम्यान ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे.
जिबूतीच्या किनाऱ्याजवळ झालेल्या या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात जीवितहानी झालीये. बोटीतून प्रवास करणाऱ्या ३०५ जणांपैकी किमान १३९ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये १५ मुलांचा समावेश आहे. ८० हून अधिक प्रवाशांना वाचवण्यात यश आलं असलं तरी ८४ जणांचा अद्याप शोध लागलेला नाही. बचाव पथकांकडून बेपत्ता प्रवाशांचा शोध घेतला जात असल्याची माहिती मिळालीये.
आफ्रिकेतील अनेक प्रवासी चांगल्या रोजगाराच्या आणि सुरक्षित जीवनाच्या शोधात जिबूतीमार्गे येमेनकडे जातात. त्यानंतर बाब-अल-मंदेब या समुद्रातील अरुंद मार्गातून प्रवास करून आखाती देशांमध्ये पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
येमेनमध्ये हिंसाचार सुरू असतानाही प्रवाशांची ही ये-जा थांबलेली नाही. जिबूतीमधील IOM चे प्रमुख अलेक्झांडर कोयसॅक यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलंय. ही घटना म्हणजे मोठी जीवितहानी असल्याचं त्यांनी म्हटलंय. रोजगाराच्या आणि आर्थिक संधींच्या शोधात या मार्गाने प्रवास करणाऱ्या लोकांना किती मोठ्या धोक्यांचा सामना करावा लागतो याची जाणीव या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा झाली आहे, असंही त्यांनी म्हटलंय.
दरम्यान बाब-अल-मंदेब आणि त्याच्या आसपासच्या भागात हूतींकडून सातत्याने हल्ले होत असल्याचं सांगितलं जातंय. बाब-अल-मंदेब हा समुद्रातील महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गातून जहाजांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. होर्मुझच्या सामुद्रधुनीला पर्याय म्हणूनही या मार्गाचा वापर केला जातो.
सध्या इराणसोबत सुरू असलेल्या तणावामुळे होर्मुझच्या मार्गावरील जहाजांची वाहतूक आधीच कमी झालीये. त्यामुळे लाल समुद्र आणि बाब-अल-मंदेब परिसरात घडणाऱ्या घटनांकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय. या भागातील सुरक्षेचा प्रश्न केवळ संबंधित देशांपुरता मर्यादित नसून त्याचा परिणाम जगातील व्यापारावरही होऊ शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.